नुकसान भरपाई देण्याची मागणी
महाबीजच्या सोयाबीनला अत्यल्प शेंगा
वरोडा येथील शेतकऱ्यांची कृषी विभागाला तक्रार
नुकसान भरपाई देण्याची मागणी
कळमेश्वर: तालुक्यातील वरोडा येथील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत देण्यात आलेले महाबीज सोयाबीनला अत्यल्प शेंगा आल्याने लावलेला खर्चही निघणार की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याबाबतची तक्रार तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळमेश्वर येथे केलेली आहे.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कळमेश्वरच्या वतीने वरोडा येथील १९ शेतकऱ्यांना प्रति एकरी ३० किलो महाबीज एमएसीएस ११८८ या जातीचे बियाणे प्रात्यक्षिक म्हणून वाटप करण्यात आले होते. सर्व शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार उगवण क्षमता तपासणे, बीजप्रक्रिया, किटकनाशक फवारणी इत्यादी बाबी केल्यात. परंतु उंच वाढलेल्या सोयाबीनला मात्र पाहिजे त्या प्रमाणात शेंगा आल्या नसल्याने झालेला खर्च ही निघणे कठीण झाले आहे. यामुळे संबंधित विभागाने सोयाबीन पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी नरेंद्र डाखोळे, हिरामण डाखोळे, गंगाराम दाडे, बाळकृष्ण काकडे, अनिल राऊत, कैलाश लोहकरे, पुरुषोत्तम खडसे, तुळशीदास खडसे, अभिजित राऊत, हरिचंद्र टेकाडे, लीलाधर डाखोळे, नरेश राऊत, अण्णाजी राऊत, मंगेश बेन्डे, अरुण हिवरे, श्रीराम डाखोळे, प्रमोद काकडे, शिवाजी डाखोळे, गेंदराज राऊत, गणपत भोयर, दिलीप डाखोळे आदींनी केली आहे.
--
शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार सोयाबीनची पाहणी केली असून लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांना या बाबतचा अहवाल पाठविण्यात येणार आहे
विनोद डहाट, कृषी पर्यवेक्षक
---
तालुका कृषी कार्यालय कळमेश्वर कडून देण्यात आलेल्या महाबीजच्या सोयाबीनला अत्यल्प शेंगा आलेल्या आहेत. परंतु त्यातही दाणे भरण्याची चिन्हे नाहीत. याबाबत कृषी विभागाकडून पाहणी करण्यात आली असली तरी हवामानामुळे शेंगा आल्या नसल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्येची दखल घेत नुकसानभरपाई द्यावी.
नरेंद्र डाखोळे, शेतकरी, वरोडा