नागपूर : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट, प्रवाशांना सोपी, सोईस्कर, उपयुक्त ठरेल, याकारिता महामेट्रो सुरुवातीपासूनच प्रयत्नशील आहे. नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर सोप्या व सहज पद्धतीने करता यावा, यासाठी स्मार्ट कार्ड चलनात असणे गरजेचे आहे. यासाठी महामेट्रोनागपूरने पुढाकार घेत स्टेट बँक आॅफ इंडियाच्या सहकार्याने ‘महाकार्ड’ची सेवा नागरिकांना उपलब्ध करून देणार आहे.सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्याकरिता महामेट्रो आणि नागपूर महानगरपालिका एकत्रित आले आहे. यांच्या संयुक्त करारानुसार एकाच कॉमन कार्डद्वारे सर्व फिडर सेवा आणि मेट्रो सेवा प्रवाशांना मिळणार आहे. गेल्या वर्षी ३० सप्टेंबर रोजी महामेट्रोच्या ट्रायल रनसंबंधी झालेल्या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि स्टेट बँक आॅफ इंडियाचे तत्कालीन अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांच्या उपस्थितीत या कार्डाचे लोकार्पण करण्यात आले होते. आता हे कार्ड सर्वसामान्य नागरिकांकरिता उपलब्ध होणार आहे.कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच महाकार्ड ही एक अभिनव संकल्पना आहे. नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड स्पेसिफिकेशनच्या आधारावर हे कार्ड तयार करण्यात आले. ईएमव्ही (युरोपे, मास्टर, व्हिसा) पद्धतीवर आधारित आहे. नागरिकांना याद्वारे कुठेही सहजपणे, न थांबता प्रवास करता येणार आहे.घरापासून ते मेट्रो स्टेशन आणि परत मेट्रो स्टेशन ते आॅफिसपर्यंत उपयोगात येणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतुकीसाठी या कार्डचा वापर होईल. जसे आॅटो, मोबाईल, बस आणि मेट्रो याठिकाणी कार्ड स्वाईप करून प्रवासी दर चुकविता येईल. यासाठी प्रत्येक वेळी पैशांची गरज पडणार नाही. इतकेच नव्हे तर रोजच्या जीवनोपयोगी वस्तूदेखील नागरिकांना ‘महाकार्ड’ने खरेदी करता येईल. तसेच शॉपिंग मॉल, सिनेमागृह, उपाहारगृह अशा विविध ठिकाणीदेखील हे कार्ड वापरता येणार आहे.
‘महाकार्ड’ने मेट्रो रेल्वेचा प्रवास होणार सोपा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2018 3:14 AM