लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकापेक्षा अधिक वीज जोडणी असलेल्या कार्पोरेट ग्राहकांसोबतच महामंडळे, नगरपालिका आणि इतर आस्थापनाच्या वीज ग्राहकांसाठी महावितरणतर्फ़े ‘वीज बिल अनेक - पेमेंट एक’ सुविधा देणारी संयुक्त देयक प्रणाली सुरु करण्यात आली आहे.
संयुक्त देयक प्रणाली सुविधेनुसार एकापेक्षा अधिक वीज जोडण्या असलेल्या ग्राहकाला साध्या एका क्लिकवर एकच पेमेंट प्लॅटफॉर्मवरुन ग्राहकाच्या लघु आणि उच्चदाब श्रेणीतील सर्व प्रकारच्या वीज जोडण्यांची बिले सहजपणे बघता येत आहेत, याशिवाय त्यांच्या उपलब्ध पेमेंट वॉलेट बॅलन्समधून स्वयंचलीत वीजबिल भरणा देखील सहजतेने करता येत आहे. ग्राहकांना त्याच्याकडील सर्व वीज जोडण्यांच्या बिलांचे केंद्रीकृत ट्रॅकिंग, सर्व वीज जोडण्यांच्या बिलांचा सहज आणि नियमित भरणा, प्रति महिना प्रति बिल १० रुपये "गो-ग्रीन" सूट, वेळेवर बिल भरणा केल्याने बिलाच्या रकमेच्या १ टक्क्याची प्रॉम्प्ट पेमेंट सवलत, सर्व वीज जोडण्यांसाठी बिलाच्या रकमेच्या ०.२५ टक्के डिजिटल पेमेंट सवलत ५०० रूपयापर्यंत मर्यादित असून या सुविधेमुळे बिलींग संदर्भातील तक्रारी देखिल कमी होणार आहेत. याशिवाय विलंबित देयके अथवा थकबाकीवरील व्याज यामुळे वीज जोडणी खंडित करण्याचा त्रास वाचण्यासोबतच अर्थिक भुर्दंडाला देखील आळा बसला आहे.
महावितरणसाठी देखिल संयुक्त देयक प्रणाली उपयोगी ठरत असुन सर्व वीज जोडण्यांसाठी एकाच मुख्य ग्राहकाशी व्यवहार करता येतो सोबतच, वीजबिलापोटीचा महसुल वेळीच मिळत आहे. सोबतच वसुलीसाठी लागणारे मणुष्यबळ आणि वेळेची सोबतच वीज ग्राहकांसाथी सुरु असलेल्या एसएमएस सुविधेचा खर्च देखील कमी होतो आहे.
महामंडळे, नगरपालिका आणि इतर आस्थापना देखील संयुक्त देयक प्रणालीसाठी आपली नोंदणी करू शकतात. संयुक्त देयक प्रणालीच्या सविस्तर माहितीसाठी महावितरणच्या संकेतस्थळावरील किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी.