कोराडी : महादुला नगरपंचायतच्या वतीने शुक्रवारी २०२१-२२ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. नगरपंचायतचे लेखापाल मयूर धोटे यांनी मुख्याधिकारी डॉ. ऋचा धाबर्डे यांच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्याकडे सुपूर्द केला. १८ कोटी १० लाख ९० हजार रुपयांचा या अर्थसंकल्पात विविध योजनांची घोषणा करण्यात आली. या अर्थसंकल्पात भांडवली उत्पन्न व खर्च १०० टक्के तसेच विशेष तरतुदीनुसार महिला बालकल्याण विभागाला ५ टक्के निधी, अपंग कल्याण विभागाला ५टक्के, क्रीडा व युवा कल्याणला १० टक्के, दलित वस्ती विकासासाठी २.५ कोटी, रमाई आवास योजनेवर ४० लाख, नगरोत्थानवर २० लाख रुपये, विशेष रस्ता अनुदान एक कोटी रुपये, विशेष वैशिष्ट्यपूर्ण योजनेवर एक कोटी रुपये, रस्ता अनुदानावर २० लाख, १५ व्या वित्त आयोग अनुसार १.५ कोटी रुपये, दलितोत्तर विभागासाठी ३० लाख रुपये, पंतप्रधान आवास योजनेसाठी दोन कोटी रुपये, अल्पसंख्याकांच्या विकासासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अर्थसंकल्पीय बैठकीला नगराध्यक्ष राजेश रंगारी यांच्यासह गटनेत्या सारिका झोड, सभापती स्वप्नील थोटे, सविता ढेंगे, संगीता वरठी, नगरसेवक अर्चना मंडपे, महेश धुळस, गुणवंता पटले, छाया मेश्राम, मोहसीन शेख, तिलक गजभिये, अश्विनी वानखेडे ,कांचन कुथे, पवन पखिड्डे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. सभेचे कामकाज अशोक कुथे यांनी पहिले.
महादुला नगरपंचायतचा अर्थसंकल्प १८ कोटींचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:08 AM