लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : फेब्रुवारी महिन्यापासूनच विजेची मागणी २१ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विजेचे संकट निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊ न महाजेनकोने आतापासून विजेचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसात विजेचे उत्पादन ८०० मेगावॅट वाढविण्यात आले आहे. परिस्थितीचा सामना करण्यासाठी उत्पादन वाढवण्यास सक्षम असल्याचा दावा कंपनीने केला आहे. विजेची मागणी २५ हजार मेगावॅटपेक्षा अधिक झाल्यावर बंद युनिट सुरू केले जातील, असा दावाही कंपनीने केला आहे.फेब्रुवारी महिन्यातच हवामान बदलल्याने विजेची मागणी २१ हजार मेगावॅटच्या रेकॉर्ड स्तरावर पोहोचली. मुंबर्ईला जोडल्यास विजेची मागणी १९ फेब्रुवारी रोजी २४,५५० मेगावॅटपर्यंत पोहोचली होती. लोकमतने २३ फेब्रुवारी रोजीच्या अंकात यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. त्यात या परिस्थितीतही महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्राद्वारे १०,१७० मेगावॅट क्षमतेपैकी केवळ ७४१६ मेगावॅट विजेचे उत्पादन केले जात असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ या वाढलेल्या मागणीवरून उन्हाळ्यात विजेचे संकट ओढावण्याची शक्यता वर्तवित आहे. या वृत्तानंतर महाजेनकोने परिस्थिती लक्षात घेऊन उत्पादन वाढवले आहे. त्यामुळे खासगी वीज केंद्रावरील निर्भरता थोडी कमी झाली. मागणी वाढल्यास वीज उपलब्ध केली जाईल, असे महाजेनकोने म्हटले आहे. कंपनी महावितरणच्या मागणीनुसार विजेचे उत्पादन करते.२४ फेब्रुवारी रोजी महाजेनकोने परिस्थिती पाहता ८५०० मेगावॅट विजेचे उत्पादन केले. कंपनीच्या २८ पैकी २२ वीज युनिटने उत्पादन केले. कंपनीनुसार चंद्रपूर येथील ५०० मेगावॅटचे युनिट देखभालीसाठी बंद आहे. उर्वरित युनिट जीव शेड्युलमुळे बंद आहेत. विजेची मागणी आणखी वाढल्याने बंद युनिट सुरु केले जातील. राज्यात उन्हाळ्यात विजेची मागणी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर सर्व युनिटचे उत्पादन सुरू ठेवण्याची तयारी केली जात आहे. आवश्यकता पडलीच तर कंपनीचे २१० मेगावॉट क्षमतेचे नाशिक, भुसावळ आणि कोराडी येथील चार युनिटमधील विजेचे उत्पादन सुरु केले जाईल. यासाठी कंपनीच्या वीज केंद्रात २१ दिवसाचा कोळशाचा स्टॉकही उपलब्ध असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
उन्हाळ्यासाठी विजेचे उत्पादन वाढविण्यावर महाजेनकोचा भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 10:25 PM
फेब्रुवारी महिन्यापासूनच विजेची मागणी २१ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात विजेचे संकट निर्माण होण्याचा धोका लक्षात घेऊ न महाजेनकोने आतापासून विजेचे उत्पादन वाढवण्यास सुरुवात केली आहे.
ठळक मुद्देबंद युनिट सुरू करण्याचा दावा