निशांत वानखेडे
नागपूर : ‘गुरु गुढ रह गये, चेले शक्कर हाे गये’, अशी एक हिंदीत म्हण आहे. सच्च्या गुरुला चेल्यांचे यशस्वी हाेणे अभिमानास्पद असते. सचिन तेंडुलकरपासून सर्व दिग्गज खेळाडूंची यशस्वी वाटचाल पाहिली तर त्यांच्या गुरुचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. नुकतीच नागपूरची बाॅक्सर अल्फिया पठाण ही विश्व चॅम्पियनशीप जिंकून आली, तेव्हा प्रकाशात आल ते तिचे काेच गणेश पुराेहित यांचे नाव. विदर्भात ‘मुष्टियुद्ध’ (बाॅक्सिंग) या खेळाला प्रतिष्ठा मिळवून देणारे ‘महागुरु’ म्हणजे गणेश पुराेहित.
बाॅक्सिंग खेळाबाबत अनभिज्ञ असलेल्या विदर्भात या खेळासाठी वातावरण तयार करणे व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तराचे चॅम्पियन घडविण्यात गणेश पुराेहित यांचा सिंहाचा वाटा आहे. साधारणत: १९७२ चा काळ असेल. कराटे स्पर्धेत खेळायला गेलेल्या एका पाेलीस अधिकाऱ्याने बाॅक्सर हाेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी या खेळाविषयी फारसे माहिती नसताना शिकविण्यासाठी काेच कुठून मिळणार? चिटणीस पार्कमध्ये भारत व्यायामशाळेपासून ते कामठीच्या आरपीएफ कॅम्पपर्यंत जाऊन बाॅक्सिंग शिकण्याचा आटाेकाट प्रयत्न केला. पुढे मुंबईला जाऊनही प्रयत्न केले. त्यानंतर राज्य पातळीपासून राष्ट्रीय स्तरापर्यंत स्पर्धेत सहभाग घेतला. १९८४-८५ दरम्यान त्यांनी खेळ थांबविला. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळू शकलाे नाही याची खंत हाेती पण ती भरून काढण्यासाठी काेच हाेऊन कार्य करण्याचा नवा ध्यास त्यांनी घेतला.
१९८७ मध्ये एक डिप्लाेमा उत्तीर्ण करून नियमित काेचिंग सुरू केले. वातावरण नाही, साधनसुविधा नाही आणि व्यवस्थाही नाही. अशा विराेधाभासी परिस्थितीतून त्यांनी हळूहळू प्रवास सुरू केला. रामनगर, हिस्लाप काॅलेजसह अनेक वर्षे यशवंत स्टेडियम, गांधीबाग या ठिकाणी काेचिंग चालविले. नंतर ईश्वर देशमुख क्रीडा महाविद्यालय, सी.पी. ॲन्ड बेरार आणि आता मानकापूर स्टेडियममध्ये ते बाॅक्सिंगचे धडे देत आहेत.
गेल्या ३०-३२ वर्षाच्या काळात नागपूरसह वर्धा, भंडारा, गाेंदिया अशा जिल्ह्यातून पुराेहित यांच्याकडून धडे घेऊन राज्य स्तरावर यशस्वी झालेले १०० च्यावर तरुण महाराष्ट्र पाेलीस विभागात सेवा देत आहेत. १५ ते २० बाॅक्सर राष्ट्रीय स्तरापर्यंत पाेहचून त्यातील संजय जाॅर्डर, संजय खानपकाले यांच्यासह ६ बाॅक्सर्सनी सुवर्ण पदकांची कमाई केली. आता त्यांच्याकडून धडे घेतलेली अल्फिया पठाण पाेलंड येथे झालेल्या युवा स्पर्धेत विश्वविजेता ठरली. ते सध्या महाराष्ट्र बाॅक्सिंग असाेसिएशनचे विभागीय सचिव व सिनियर टीमचे मुख्य काेच आहेत. नुकत्याच बाॅक्सिंगवर आधारित चित्रपटात काेच म्हणून झळकण्याची त्यांना संधी मिळाली. ३० वर्षापूर्वी साेयीसुविधांबाबत जी परिस्थिती हाेती, ती आजही कायम असल्याची खंत त्यांच्या मनात आहे. मात्र केलेल्या प्रवासाचे समाधान व चॅम्पियन घडविण्याचा ध्यास आजही या महागुरुच्या मनात कायम आहे.