नागपूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांच्या यादीमध्ये आता महाज्योतीला पूर्णवेळ व्यवस्थापकीय संचालक मिळणार आहे. असे असले तरी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिवपद अवघ्या १५ दिवसात पुन्हा रिक्त झाले आहे. यामुळे एका हाताने दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतले, अशीच काहीशी अवस्था नागपुरात दिसत आहे.
प्रदीपकुमार डांगे यांना महाज्योतीचे एमडी म्हणून पाठविण्यात आले आहे. ते यापूर्वी गोंदिया जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आजवर त्यांच्याकडे महाज्योतीचे एमडी म्हणून अतिरिक्त प्रभार होता. नागपूर येथील रेशीम संचालक पदही रिक्त झाले आहे. भाग्यश्री बनायत यांना श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर संधी मिळाली आहे.
जाहीर झालेल्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास सहकारी संस्था नाशिकचे व्यवस्थापकीय संचालक एन. के. पाटील यांना आयुक्त, मानव विकास, औरंगाबाद म्हणून नियुक्त केले आहे. एमएसआरडीसीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. सी. एल. पुलकुंडवार यांना मंत्रालयात संचालक (आपत्ती व्यवस्थापन) महसूल आणि वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन संचालक एल. एस. माळी यांना सचिव, नियामक प्राधिकरण, मुंबई आणि पुणे मनपाच्या अतिरिक्त आयुक्त कविता द्विवेदी यांना अकोला महानगरपालिका आयुक्त म्हणून पाठविण्यात आले आहे.
...
विदर्भ वैधानिक विकास महामंडळ पुन्हा पोरके
विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिवपद १५ दिवसातच पुन्हा रिक्त झाले आहे. १५ दिवसापूर्वीच येथे आलेले दीपक सिंगला यांची नाशिकला आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी बदली झाली आहे. अनेक दिवसापासून रिक्त असलेल्या या पदावर प्रशासकीय अधिकारी मिळाल्याने विदर्भाच्या विकासाला न्याय मिळेल, अशी अपेक्षा असतानाच या बदलीमुळे मोठा धक्का बसला आहे. येथे पदभार स्वीकारला असला तरी ते या नियुक्तीवरून नाराज होते, अशी माहिती आहे.
...