नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या विविध धोरणात क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार कार्य यांचे प्रतिबिंब दिसून येते. त्यामुळे त्यांच्या सर्व विचारांचे व कार्याचे प्रतिबिंब ज्या साहित्यात आहे असे साहित्य जनसामान्यांना सहज उपलब्ध होणे आवश्यक आहे, त्यामुळे महाज्योतीने महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची घोषणा इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी केली.
महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूरच्या संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी पार पडली. बैठकीत महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे एकत्रित महावाङ्मय प्रसिद्ध करण्याचा ठराव संमत करण्यात आला. या शिवाय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या मौजे नायगाव, ता.खंडाळा, जि.सातारा येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनानिमित्त विविध शैक्षणिक उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी १० लक्ष इतका निधी मंजूर करण्यात आला. या शिवाय सारथीच्या धर्तीवर महाज्योतीच्या लाभार्थ्यांना देखील समान लाभ देण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक प्रवीण देवरे हे उपस्थित होते.
इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महाज्योतीच्या जीईई, नीट एमएचटी-सीईटी योजनेतील विद्यार्थ्यांना टॅब व सीम चे वाटप करण्यात आले तसेच कौशल्य विकास प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना रोजगार पत्राचे वाटप देखील करण्यात आले. या बैठकीच्या प्रसंगी व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षण घेणाऱ्या २० ट्रेनी पायलट यांनी सावे यांचे स्वागत केले.
- १२०० पानाचा ग्रंथ, २७ हजार प्रती छापणार
महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे समग्र महावाङ्मयाचा ग्रंथ एकूण १२०० पानाचा असेल. महाज्योती एकूण २७ हजार प्रती प्रकाशित करेल. परंतु हा ग्रंथ विक्रीसाठी राहणार नाही. महाज्योती हा ग्रंथ समाजातील विविध मान्यवरांना भेट देईल. जिल्हाधिकारी व इतर काही अधिकाऱ्यंकडेा ठेवली जातील. हे ग्रंथ समाजाजतील गुणवंत विद्यार्थीू व इतर गुणवंतांच्या सत्कार करताना त्यांना प्रदान केली जातील, असे महाज्योतीचे वस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी साांगितले.