नागपूर : महाज्योतीने अर्थसहाय्य दिलेल्या १३१ विद्यार्थ्यांना महाराष्ट्र प्रशासनात विविध विभागात प्रशासकीय काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यातील ६८ विद्यार्थी हे इतर मागास वर्ग, ११ विद्यार्थी विमुक्त जाती, भटक्या जमाती– ब वर्गातील ११ विद्यार्थी, भटक्या जमाती– क मधील १८ तर भटक्या जमाती– ड मधील २० विद्यार्थ्यांचा तसेच विशेष मागास प्रवर्गातील ३ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना राबविण्यात येते.
महाज्योतीने सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याची योजना सुरु केली होती. त्याकरिता एकूण ४३९ उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यापैकी योजनेकरिता पात्र ४३७ विद्यार्थ्यांना एम.पी.एस.सी. राज्यसेवा परीक्षेच्या व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता अर्थसहाय्य करण्यात आले होते.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. महाज्योतीतर्फे राबविण्यात येणाऱ्या एम.पी.एस.सी. व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेकरिता एकरकमी अर्थसहाय्य करण्याऱ्या योजनेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा.
- राजेश खवले, व्यवस्थापकीय संचालक महाज्योती, नागपूर