नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) ओबीसी विद्यार्थ्यांसाठी नीट-जेईई प्रशिक्षण सुरू केले आहे. यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट्स-पुस्तके देण्यात येणार होती. या योजनेचा मोठा गाजावाजा झाला; परंतु ऑनलाईन प्रशिक्षण घेणाऱ्या या ओबीसी विद्यार्थ्यांना गेल्या सात महिन्यांपासून टॅब्लेट्स व पुस्तके मिळालेलीच नाही. त्यामुळे हे प्रशिक्षण सध्या तरी कागदावरच असल्याचे दिसून येते.
ओबीसी विद्यार्थीसुद्धा जास्तीत जास्त संख्येने वैद्यकीय व इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात जावे यासाठी ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (महाज्योती) या विद्यार्थ्यांसाठी जेईई-नीट परीक्षेच्या पूर्व परीक्षा प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली. त्यासाठी या विद्यार्थ्यांना टॅब्लेट्स व पुस्तके देण्यात येणार आहे. १८ महिन्यांचे हे ऑनलाईन प्रशिक्षण आहे. पुढच्या वर्षी एप्रिल-मे मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी राज्यभरातून ८९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. ७ डिसेंबर २०२१ रोजी प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सात महिने लोटले आहेत; परंतु या विद्यार्थ्यांना ना पुस्तके मिळाले ना टॅब्लेट्स. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रशिक्षण नेमके सुरू तरी कसे आहे हा प्रश्नच आहे.
- प्रशिक्षणाचे अवलोकन तरी केले का?
सध्या कोरोना नाही. निधीची कमीही नाही. तेव्हा या विद्यार्थ्यांना सात महिन्यांपर्यंत टॅब्लेट्स-पुस्तके का मिळाली नाहीत. ते कधीपर्यंत मिळतील? हा प्रश्न आहे आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाज्योतीने ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केले, परंतु हे प्रशिक्षण कसे सुरू आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ होतोय की नाही याचे अवलोकन तरी केले का? ते केले असले तर ही वेळ आलीच नसती.
उमेश कोराम, स्टुडंट राईट्स असोसिएशन ऑफ इंडिया