भारतातून १० हजार प्रतिनिधी येणार नागपूर : नॅशनल फेडरेशन आॅफ इन्शुरन्स फिल्ड वर्कस् आॅफ इंडिया या आयुर्विमा महामंडळाच्या विकास अधिकाऱ्यांच्या एकजुटीला नुकतेच ६० वर्षे पूर्ण झाली आहेत. या हीरक महोत्सवानिमित्त नागपूर शाखेच्या वतीने ‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २८ आणि २९ जानेवारीला क्रीडा संकुल, मानकापूर येथे करण्यात येणार आहे. उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी एलआयसीचे माजी अभिकर्ता, विकास अधिकारी आणि माजी खासदार दत्ता मेघे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. भारतातून १० हजारावर प्रतिनिधी यावेळी सहभागी होणार आहेत. परिषदेत डाटाकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी व कार्यकारी संचालक अजय अरोरा (मुंबई) आणि मार्गदर्शक डॉ. रिझाल नायडू (मलेशिया) ग्राहक मानसिकतेबाबत मार्गदर्शन करतील. विवेक बिंद्रा हे अभिकर्त्यांना जीवनात सकारात्मकतेचे महत्त्व तर उद्योजक कॅ. मोहनसिंग कोहली हे जीवनातील चढ-उतारांमधून शिकावी अशी ऊर्जा, यावर प्रत्यक्ष जीवनावर आधरित अनुभव मांडतील. अभिकर्त्यांनी यशस्वी व्यवसायाच्या नीतींमधून प्रगती कशी साधावी, यावर पंजाब सिंग (पाटणा) विचार व्यक्त करतील, तर उद्योजक राजेश सातोसकर (मुंबई) हे यशस्वी कारकीर्दीचे रहस्य उपस्थितांपुढे खुले करतील. (प्रतिनिधी)
‘इन्शुरन्सचा महाकुंभ’ २८ पासून
By admin | Published: January 25, 2017 3:00 AM