लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यंदा महालक्ष्मी गौरीची स्थापना २५ की २६ ऑगस्ट, असा गोंधळ उडालेला आहे. २५ ऑगस्टला अनुराधा नक्षत्र सुरू होत असल्याने याच दिवशी महालक्ष्मी-गौरीची स्थापना करणे योग्य असेल, अशी माहिती आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी दिली आहे.यंदा सर्व पंचांगात महालक्ष्मी व्रतासाठी वेगवेगळ्या तारखा दिल्या असल्याने हा गोंधळ उडालेला आहे. धर्मशास्त्रानुसार साधारणत: नक्षत्र प्रधान असलेले हे व्रत गणेश चतुर्थीच्या तिसऱ्या दिवसापासून केले जाते. भाद्रपद शुक्ल पक्षात अनुराधा नक्षत्रावरच महालक्ष्मीचे आवाहन करावे, ज्येष्ठा नक्षत्रावर महालक्ष्मी पूजन, महानैवेद्याचा कुळाचार आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावे, असे शास्त्र सांगते. त्याच अनुषंगाने मंगळवारी २५ ऑगस्टला दुपारी १.५३ वाजतानंतर अनुराधा नक्षत्र सुरू होत असल्याने, तेव्हापासून महालक्ष्मी-गौरीचे आवाहन करावे. बुधवारी २६ ऑगस्टला महालक्ष्मी-गौरी पूजन, महानैवेद्य आपापल्या कुळाचाराप्रमाणे करून गुरुवारी २७ ऑगस्टला दुपारी १२.३२ वाजतानंतर मूळ नक्षत्रावर आपापल्या परंपरेप्रमाणे विसर्जन करावे, असे वैद्य यांनी सांगितले आहे.