गणेश हूड, नागपूर : मुंबई येथील 'महालक्षमी सरस' २०२३ – २४ ला चांगला प्रतिसाद मिळाला होता. राज्य शासनाने यावर्षी नागपुरात अतिरिक्त सरस आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार येथील रेशीमबाग मैदानावर १६ ते २६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत ' महालक्ष्मी सरस' चे आयोजन करण्यात येणार आहे.
महालक्ष्मी सरस मध्ये एकूण २५० स्टॉल राहणार असून यामध्ये १०० खाद्यपदार्थांचे व १५० इतर स्टॉल्स राहणार आहे. ग्रामीण भागातील स्वयं सहाय्यता समुहांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळावी या करीता राज्यस्तरावर, विभागस्तरावर आणि जिल्हास्तरावर प्रदर्शनींचे आयोजन करण्यात येते.
सन २००४ पासून ग्राम विकास विभागातंर्गत मुंबई येथे महालक्ष्मी सरस प्रदर्शना चे आयोजन करण्यात येते. देश पातळीवर प्रत्येक राज्यात विक्री व प्रदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मागील वेळी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानामार्फत २६ डिसेंबर २०२३ ते ८ जानेवारी २०२४ या कालावधीत मुंबईच्या बीकेसी येथे महालक्ष्मी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते.