नागपूर - पहिल्यांदाच नागपूर शहरात आयोजित महालक्ष्मी सरस प्रदर्शनी महिला बचत गटांना पावली आहे. दहा दिवसाच्या या प्रदर्शनीत ४ कोटी ५० लाख रुपयांच्या मालाची विक्री झाली आहे. महालक्ष्मी सरस प्रदर्शन म्हणजे ग्रामविकास विभागाच्या उमेद अभियानाचा महोत्सव आहे. राज्यातील उद्योगशील महिलांचा या प्रदर्शनात सहभाग होता.
या प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. अशा आयोजनातून बचत गटातील महिलांच्या स्वयं रोजगाराला चालना मिळते. शासनातर्फे पहिल्यांदाच अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शन नागपूर येथे १७ ते २६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आले. नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे ४ कोटी ५० लाख रुपयांची विक्री झाल्याचे जिल्हा परिषद नागपूरच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी पारितोषिक वितरणप्रसंगी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभाग उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष,मुंबई यांच्या वतीने तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,जिल्हा परिषद नागपूर यांच्या समन्वयाने अतिरिक्त महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी प्रकल्प संचालक वर्षा गौरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कपिल कलोडे, गटविकास अधिकारी राजनंदिनी भागवत, संदीप गोडशेलवार, राज्य अभियान व्यवस्थापक रामदास धुमाळे, हरेश्वर मगरे, नितीन हर्चेकर, अभियान व्यवस्थापक विशाल जाधव, सागर गायकवाड,प्रियंका सादिगले, जिल्हा अभियान व्यवस्थापक शेखर गजभिये, जिल्हा व्यवस्थापन सारंग कुंटे, सोनाली भोकरे, भाग्यश्री भोयर सुनिता निमजे,अल्पना बोस, यांच्यासह अधिकारी, जिल्हा समन्वयक व महिला उपस्थित होत्या.