नागपूर : नागपूरच्या विकासावर आधारित या महाचर्चेत एकूण चार सत्रात नागपूर शहरातील विविध नागरी प्रश्नांवर विचारमंथन झाले. पहिल्या सत्रात ‘नागपूर शहराचा मूलभूत विकास आणि उपाय’ ( नगर विकास, नागरी सुविधा, २४ तास शुद्ध पाणी, शहर वाहतूक व्यवस्था, उद्याने व क्रीडांगणे, टाऊन हॉल, घनकचरा विल्हेवाट, रस्ते, सार्वजनिक शौचालय, कचऱ्याचे सिंगापूर सुंदर होऊ शकते मग नागपूर का नाही ? ) या विषयावर ऊर्जा व उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर प्रवीण दटके, नासुप्रचे सभापती दीपक म्हैसेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे, ‘नीरी’चे वरिष्ठ वैज्ञानिक पवन लाभसेटवार उपस्थित होते. दुसऱ्या सत्राचा विषय ‘झोपडपट्ट्यांचा विकास’ (सरकारी योजना व अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्या व अपेक्षा, भविष्यात झोपडपट्ट्या निर्माण होऊ नये, अतिक्रमण निर्माण होऊ नये ) हा होता. यात आमदार प्रकाश गजभिये, कृष्णा खोपडे, ज्येष्ठ नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, नगरसेविका प्रगती पाटील, वास्तुविशारद वीरेंद्र खरे सहभागी झाले होते.तिसऱ्या सत्रात ‘नागपूर मेट्रो व पायाभूत विकास’ (पार्किंगच्या योजना, पार्किंग स्थळांवरील अतिक्रमण, प्रस्तावित योजना, फूटपाथची स्थिती, अंध अपंग वृद्ध नागरिकांसाठी व्यवस्था ) या विषयावर झालेल्या चर्चेत आमदार सुधाकर कोहळे, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष अनिल नायर, उद्योगपती व वास्तुविशारद अशोक मोखा यांनी मत मांडले. चौथ्या व अखेरच्या सत्रात ‘महापालिका आणि नासुप्र आपली जबाबदारी पार पाडत आहेत का ?’ (करदात्यांना सोयी सुविधा मिळतात का, भ्रष्टाचार, चुकीचे नियोजन आणि व्होट बँक यामुळे शहराचा विकास खुंटला का ?) या विषयावर चर्चा झाली. यात आमदार अनिल सोले, मनपातील सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, ‘वेद’चे अध्यक्ष देवेंद्र पारेख व ‘व्हीआयए’चे अध्यक्ष अतुल पांडे सहभागी झाले होते. मॉडरेटर म्हणून लोकमतचे संपादक दिलीप तिखिले, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमत समाचारचे निवासी संपादक हर्षवर्धन आर्य, लोकमतचे सहाय्यक संपादक गजानन जानभोर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
महाचर्चेत झाले महामंथन
By admin | Published: September 12, 2016 2:45 AM