लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फुटाळा तलाव परिसरात महामेट्रोचे काम सुरू आहे. कंत्राटदाराने दुर्लक्ष केल्याने सोमवारी रात्रीच्या सुमारास ५०० मि. मी. व्यासाची मुख्य जलवाहिनी फुटली. यामुळे शहरातील काही वस्त्यांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार आहे.
जलवाहिनी अजूनही दुरुस्त न झाल्यामुळे जुना फुटाला, नवीन फुटाला, संजय नगर वसाहत, सुदाम नागरी पंकज नगर, हिंदुस्थान कॉलनी, धोबी घाट आदी वस्त्यांचा पाणी पुरवठा बुधवारी बंद राहणार असल्याची माहिती ओसीडब्ल्यूने दिली.
दरम्यान, पेंच २ आणि ३ जलशुद्धीकरण केंद्रातील शडडाऊनमुळे तेलंगखेडी हनुमान मंदिर परिसर, हिमालय वाली आणि अंबाझरी रोडचा भागाचा पाणी पुरवठा मंगळवारी बंद होता.
सोमवारी जोराचा पाऊस सुरू होता. पावसामुळे माती पडल्याने पाइपलाइनवरील भार वाढल्याने ती नादुरुस्त झाली. दुरुस्तीचे काम ओसीडब्ल्यू व महामेट्रोतर्फे युद्धपातळीवर सुरू आहे. तातडीने काम पूर्ण केले जात असल्याची माहिती महामेट्रोचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क कापोंरेट ) अखिलेश हळवे यांनी दिली.