नागपूर : आपले बाबासाहेब गेले, आपले बाबासाहेब गेले हाे... दहा-अकरा वर्षांचा मुलगा वस्ती-वस्तीत रिक्षाने फिरून माईकवर ही बातमी सांगत हाेता. त्याची ही आराेळी ऐकून लाेकांच्या काळजाचा ठाेका चुकला. काळीज हेलावणाऱ्या या बातमीवर विश्वास कसा ठेवायचा... लाेक त्या बारक्या मुलाला शिव्या द्यायचे, मारायला अंगावर धावून यायचे..., पण बातमी खरी असेल तर...? बातमी खाेटी ठरली तर जिवंत साेडणार नाही, अशा धमक्या देत हवालदिल झालेली माणसे रेल्वे स्टेशनकडे धावायला लागली...
धार्मिक गुलामगिरीच्या अंधारात शेकडाे वर्षे खितपत पडलेल्या शाेषित, पीडित, वंचित समाजाला माणूस म्हणून हक्क मिळवून देत बुद्धाच्या प्रकाशात आणणारे महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाची बातमी वाऱ्यासारखी पसरत असताना नागपुरात घडलेला हा प्रसंग. त्यावेळी १०-११ वर्षांचा असलेला हा मुलगा म्हणजे दामू माेरे आता ८७ वर्षांचे झाले आहेत. दरवर्षी महापरिनिर्वाण दिन आल्यानंतर त्या आठवणीने आजही दामू माेरे व्यथित हाेतात. ही दु:खद बातमी आपल्याला सांगावी लागली, ही त्यांच्या मनातील वेदना आजही कायम आहे.
नागपुरातील प्रसिद्ध मोरे साउंड सर्व्हिस हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय. मोरे बंधू यांचा आंबेडकरी चळवळीशी जवळचा संबंध होता. चळवळीतील स्थानिक नेतेमंडळी त्यांच्याकडे येत-जात असत. ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे दिल्लीत महापरिनिर्वाण झाले. त्याची माहिती नागपुरातील काही नेत्यांना समजली. ही माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी काहीजण मोरे यांच्याकडे आले. दुकानात त्यांचे काका बसले होते. लहानगा दामूही होता. बाबासाहेब गेल्याची बातमी ऐकताच काकांना हुंदके आवरणे कठीण झाले. त्यांनी दामूवर ही जबाबदारी टाकली. त्याला नेमके काय बोलायचे आहे, तो मजकूरही एका पानावर लिहून दिला. दामू हा स्वत: साउंड सर्व्हिसचे काम करीत असल्याने त्याला त्याची समज होतीच. एक रिक्षा करण्यात आली, त्यात माईक व इतर साहित्य घेऊन दामू बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची बातमी देत निघाला. एकेक वस्ती करीत तो शहरभर फिरला.
लाेक अंगावर धावून गेले
बारक्या पाेराकडून बाबासाहेब गेल्याची बातमी ऐकून लाेकांच्या काळजाचा ठाेका चुकला. श्वासात ग्लानी येत हाेती. काही लोक शिव्या देत. लाेक अक्षरश: त्याच्या अंगावर धावून गेले. बातमी खोटी ठरली तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकीसुद्धा देत होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची ती बातमी लोकांपर्यंत पोहोचविणे हे तेव्हाचे काम म्हणजे जिवावर उदार होऊन करणेच ठरले.
लाेक रेल्वे स्टेशनकडे धावत सुटले
बाबासाहेब गेल्याची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरली. हाहाकार माजला. लाेक ओक्साबोक्सी रडू लागले. दामू सांगतात, महापरिनिर्वाणाची बातमी देऊन झाल्यावर घरी जायला निघालाे हाेताे. तेव्हा लाेक मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्टेशनकडे धावत सुटले हाेते...