लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराज बागमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे कारण देत केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने (सीझेडए) संग्रहालयाची मान्यता रद्द करण्यात येत असल्याचा मेल पाठविल्याने खळबळ उडाली आहे. भोसलेकालीन १२५ वर्षीय जुनी महाराज बाग बंद होण्याची शक्यता आहे.याबाबत महाराज बाग प्राणिसंग्रहालयाने तातडीने पावले उचलत केंद्र सरकारकडे अपील करण्याची तयारी केली आहे.३ डिसेंबर रोजी धडकलेल्या या ‘मेल’ला घेऊन महाराज बाग अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ‘सीझेडए’च्या नियमानुसार प्राणिसंग्रहालयाच्या विकास कार्यासाठी २०११ मध्ये ‘मास्टर प्लॅन’ तयार करून मंजुरीसाठी दिल्ली कार्यालयात पाठविला. त्यानंतर यात विविध सुधारणा करण्याच्या सूचना आल्या. त्यानुसार २०११, २०१२ आणि २०१४ मध्ये सुधारित ‘प्लॅन’ पाठविले. २०१६ मध्ये पुन्हा सुधारित करण्यात आलेला ‘प्लॅन’ ‘सीझेडए’ला देण्यात आला. परंतु याला मंजुरी मिळाली नाही. यामुळे विकास कार्याची सुरुवातच होऊ शकली नाही. अखेर फेब्रुवारी २०१८ मध्ये प्राणिसंग्रहालयाचा ले-आऊट प्लॅन (नकाशा) मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर मे २०१८ ला दिल्लीमध्ये झालेल्या एका निर्णयात प्राधिकरणाने लवकरच नकाशाला मंजुरी देण्याचे आश्वासन दिले होते. आता मान्यताच रद्द करण्याचा ‘मेल’ आल्याने आवश्यक पुढील पावले उचलली जाणार आहेत. या पूर्वीही प्राणिसंग्रहालय बंद करण्याचे दोन वेळा पत्र मिळाले होते.मान्यता रद्द करण्याची कारणे‘सीझेडए’ने नियमानुसार प्राणिसंग्रहालय परिसरात योगासन क्लास, मॉर्निंग वॉक, बालोद्यान वेगळा करण्याचे, संरक्षण भिंत बांधण्याचे, प्लास्टिक बॅगवर प्रतिबंध लावण्याचे, श्वान व अन्य प्राण्यांचा प्रवेश थांबविण्याचे, सक्षम अधिकाऱ्याची नेमणूक, क्युरेटर, बॉयोलॉजिस्ट, व्हेटरनरी व इतरही पद भरती करण्याची, विनापरवानगी वन्यप्राण्यांना मुक्त करण्याची, पिंजऱ्याचे नविनीकरण करण्याचे, वन्यप्राण्याची ये-जा करण्याची परवानगी न घेतल्याने, वन्य प्राण्यांच्या जोड्या योग्य पद्धतीने न ठेवल्याने, हरणांचे स्थानांतरण करताना मंजुरी घेतली नसल्याने, पर्यटकांसाठी आवश्यक सोयी नसल्याचे कारण देऊन मान्यता रद्द करण्याचा दावा करण्यात आला आहे.विद्यापीठस्तरावर पद भरतीचा प्रयत्नमहाराज बागचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर म्हणाले, ‘सीझेडए’कडून नकाशा मंजूर नाही. यामुळे विकास कार्य थांबलेले आहे. प्राणिसंग्रहालयाच्या आवश्यक पद भरतीसाठी विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन लवकरच पदभरतीसाठी प्रयत्न केले जातील.