नागपूर : येथील महाराज प्राणीसंग्रहालयाच्या अद्ययावतीकरणासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे नव्याने मास्टर प्लॅन सादर झाला आहे. ८४ कोटी रुपये खर्चाच्या या आराखड्यातून प्राणीसंग्रहालय आणि महाराजबागेचा चेहरामोहराच बदलण्याची योजना आहे. नव्या प्लॅनमध्ये येथील प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या अद्ययावतीकरणासोबतच पर्यटकांसाठी ॲम्पिथिएटर, वाचनालय, पार्किंग आणि खानपानासह दुकानेही राहणार आहेत.
प्राण्यांची सुरक्षा आणि काळजी हे मुख्य धोरण असले तरी, पर्यटकांचाही विचार या आराखड्यात करण्यात आला आहे. येथे सध्या ४२६ प्राणी आणी पक्षी असून, महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे व्यवस्थापन पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडे आहे. पर्यटकांची वाढती गर्दी आणि प्राण्यांच्या सुविधेसाठी सुधारणा करण्याची गरज होती. यासाठी केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाकडे २०१८ मध्ये महाराजबागेचा प्रस्तावित आराखडा पाठविला होता. मात्र त्यात अनेक सुधारणा सूचविण्यात आल्यानंतर सर्व तपशिलाचा विचार करून आता नव्याने मास्टर प्लॅन तयार करून पाठविण्यात आला आहे.
येथील प्राणीसंग्रहालयात सध्या आठ खुले पिंजरे (ओपन एन्क्लोजर) आणि २७ बंद पिंजरे आहेत. ते बरेच जुने झाल्याने येथे आधुनिक पिंजरे लावले जाणार आहेत. अनुसूची एक आणि दोनमधील प्राण्यांची संख्या भविष्यात वाढविली जाणार असून, त्यासाठी प्राधिकरणाची परवानगी घेतली जाणार आहे.
अशा झाल्या घडामोडी
- प्राणीसंग्रहालय नियम-२००९ अंतर्गत असलेल्या अनेक नियमांचे आणि आदेशांचे पालन न झाल्याने केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाने महाराजबागेची मान्यता कायम राखण्यावर आक्षेप घेतला होता. या संदर्भात २९ नोव्हेबर २०१८ ला प्राधिकरणाने पत्र दिले होते.
- यापूर्वी महाराजबागेला प्राधिकरणाकडून १० डिसेंबर १९९७ मध्ये पहिल्यांदा नोटीस देण्यात आली होती.
यात व्यवस्थापनाने हे प्राणीसंग्रहालय बंद करावे किंवा अन्य योग्य ठिकाणी स्थानांतरित करण्याचे सुचविले होते.
- त्यानंतर प्राधिकरणाच्या चमूने वारंवार येथील प्राणीसंग्रहालयाचे मूल्यांकन करून अहवाल दिला.
- अखेरचे मूल्यांकन जानेवारी-२०१८ मध्ये करण्यात आले होते. केंद्र सरकारकडे विनंती केल्यावर प्राधिकरणाने मास्टर प्लॅनमध्ये सुधारणा करण्यासाठी सहमती दर्शविली होती.
नव्या मास्टर प्लॅनमध्ये प्रस्तावित
- भव्य प्रवेशद्वार आणि प्राणीसंग्रहालयासाठी स्वतंत्र गेट
- दोन सुरक्षा चौकी, दक्षतेसाठी दोन वॉच टॉवर
- प्रवेश प्लाझा, पार्किंग आणि आसन व्यवस्था आणि पेव्हर्स
- अभ्यागतांसाठी ४.५ मीटरचा सिमेंट काँक्रिट रोड आणि ३ मीटर रुंदीचा सर्व्हिस रोड
- रेस्टॉरंट, कॉफी हाऊस, लायब्ररी आणि इंटरप्रिटेशन सेंटर
- कर्मचाऱ्यांसाठी क्वॉटरर्स, प्रशासकीय कार्यालय
- पशुवैद्यकीय रुग्णालय, रोगनिदान प्रयोगशाळा आणि पोस्टमार्टम रूम
- फायर हायड्रंट्स पाईपलाईन, चिल्ड्रन पार्कमध्ये अद्ययावत उपकरणे
- प्राणीसंग्रहालयासाठी वाहने
- वाघ, बिबट प्राण्यांचे एन्क्लोजर क्षेत्र वाढवून अद्यावत सुधारणा