Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 11:51 PM2019-10-23T23:51:04+5:302019-10-23T23:57:37+5:30

निकालाच्या आदल्या दिवशी विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली.

Maharashtra Assembly Election 2019: Adala Day of Result: Dham Dhoom at BJP office in Nagpur | Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

Next
ठळक मुद्देदिवसभर आढावा बैठका : इतरांच्या उमेदवारांची व्यक्तिगत तयारी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी सकाळी ईव्हीएम मशीनची पेटी उघडताच इतक्या दिवसांपासून लागलेली विधानसभा निवडणूक निकालाची प्रतीक्षा संपलेली असेल. मात्र आज निकाल कुणाच्या बाजूने लागेल, प्रचारादरम्यान लावलेले मतदानाचे गणित जुळेल की चुकेल, याच्या अंदाजाने निकालाच्या आदल्या दिवशी मात्र उमेदवारांची चलबिचल वाढली आहे. ही परिस्थिती प्रमुख राजकीय पक्षांच्या कार्यालयातही दिसून आली. विजयाचा आत्मविश्वास असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांची धामधूम लागली होती; तर काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर पक्षांच्या कार्यालयात शांतता दिसून आली. मात्र या उमेदवारांची मतमोजणीसाठी व्यक्तिगत तयारी चालल्याचे चित्र दिसून आले.
मतदानानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांनी दाखविलेल्या एक्झिट पोलनंतर विजयाची खात्री असलेल्या भाजपच्या कार्यालयात अपेक्षेप्रमाणे लगबग चालली होती. पक्षाच्या उमेदवारांनी प्रचारासाठी वैयक्तिकपणे तयार केलेल्या प्रचार कार्यालयात कार्यकर्त्यांनी तयारी चालविली होती; तसेच पक्षाच्या कार्यालयातही मतमोजणीसाठीची तयारी चालली होती. भाजपच्या धंतोली येथील कार्यालयात आदल्या दिवशी पक्षाच्या शहरातील उमेदवारांसोबत प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. भाजपचे विभागीय संघटनमंत्री डॉ. कोठेकर यांच्या अध्यक्षतेत पार पडलेल्या आढावा बैठकीत विकास कुंभारे, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, सुधाकर देशमुख, मोहन मते या उमेदवारांसह आमदार प्रा. अनिल सोले, गिरीश व्यास, भाजप शहराध्यक्ष प्रवीण दटके तसेच सहा विधानसभा क्षेत्रातील निवडणूक प्रमुख, प्रभारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. मतदानाचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचे प्रवीण दटके यांनी सांगितले. मतमोजणी केंद्राच्या प्रत्येक टेबलसाठी एक एजंट व यांच्या मार्गदर्शनासाठी एक प्रमुख नेमण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रा. अनिल सोले यांनी, मतमोजणी शांततेत पार पाडण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक मतदार संघाची स्वतंत्र मतमोजणी करणार असून, उमेदवार तेथे हजर राहतील. विजय आमचाच आहे, असा विश्वास व्यक्त करीत त्या केंद्रावरून विजय रॅली निघेल, असे त्यांनी सांगितले. दक्षिण नागपूरचे भाजपा उमेदवार मोहन मते यांच्या प्रचार कार्यालयात दुपारी आढावा बैठक घेण्यात आली व कार्यकर्त्यांना सूचना करण्यात आल्या. प्रत्येक फेरीतील मतांचे आकडे गोळा करणे व ते प्रमुखांपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी देण्यात आली असल्याचे येथील एका कार्यकर्त्याने सांगितले. 


दरम्यान, शहर काँग्रेस कमिटीच्या देवडिया भवन कार्यालयात आदल्या दिवशी शांतता होती व गणेशपेठ येथील ग्रामीण कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. राष्ट्रवादीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात काही कार्यकर्ते हजर होते, मात्र शांतता होती. मात्र या पक्षांच्या उमेदवारांनी वैयक्तिक स्तरावर मतमोजणीसाठी तयारी चालविल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांना प्रत्येक फेरीच्या मतमोजणीबाबत सूचना देण्यात आल्याचे सांगण्यात आले. पश्चिमचे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे व दक्षिणचे गिरीश पांडव यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्याचे सांगण्यात आले. बसपा व वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनीही कार्यकर्त्यांशी चर्चा करून मतदानाचा आढावा घेतल्याची माहिती आहे. 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Adala Day of Result: Dham Dhoom at BJP office in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.