लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : या देशाला बाबासाहेबांनी संविधान देऊन प्रत्येक धर्माला स्वतंत्रपणे जगण्याचा हक्क दिला. पण गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.एमआयएमआयएमचे मध्य व उत्तर नागपूर विधानसभेचे उमेदवाराच्या प्रचारासाठी ते नागपुरात आले होते. यावेळी त्यांनी भाजपाबरोबरच काँग्रेस व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही ताशेरे ओढले. त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरएसएसच्या दसरा मेळाव्यात केलेल्या वक्तव्यावर टीका केली. ते म्हणाले की, मॉब लिंचिंगमध्ये ज्यांची हत्या झाली त्या हत्यारांचा सन्मान करण्यात आला.काँग्रेस पक्षाबद्दल बोलताना ओवेसी म्हणाले की, काँग्रेस पार्टी आता संपण्याच्या मार्गावर आहे. निवडणुका आल्या की काँग्रेस पक्षाला जनतेच्या समस्या दिसतात. निवडणुका संपल्या की, त्याकडे दुर्लक्ष केले जाते. आज काँग्रेस विरोधक म्हणूनही उभी राहू शकत नाही. त्यामुळे जनतेने आता काँग्रेसच्या हातात हात देऊ नये, अशीही टीका त्यांनी केली. यावेळी एआयएमआयएमचे विदर्भ युथ अध्यक्ष शाहीद रंगूनवाला, नागपूरचे जिल्हा प्रभारी निसार सिद्दीकी, नागपूर शहर अध्यक्ष जावेद अख्तर, युथ अध्यक्ष बकारुद्दीन अन्सारी उपस्थित होते.
Maharashtra Assembly Election 2019: देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केली आहे : असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:10 AM
गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने धर्मावर केलेल्या हल्ल्यामुळे देशाची राष्ट्रीय एकात्मता कमजोर केल्याचा आरोप ऑल इंडिया मजलिस -ए- इत्तेहादूल मुस्लिमीन (एआयएमएएम) चे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी नागपुरात केला.
ठळक मुद्देकाँग्रेसवरही केला प्रहार