लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशातील तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष असलेल्या बहुजन समाज पार्टीची (बसपा) सुरुवात महाराष्ट्रातून झाली. उत्तर प्रदेशात चारवेळा सत्ता स्थापन केली. परंतु महाराष्ट्रात अद्याप एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. हे शल्य बसपाच्या मिशनरी कार्यकर्त्यांना नेहमीच बोचत असते. खुद्द बसपाचे संस्थापक कांशीराम यांना याची खंत होती. मायावती यांनीसुद्धा हे शल्य बोलून दाखविले. त्यामुळे बसपाने यंदा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत खाते उघडण्यासाठी कंबर कसली आहे. बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे.विदर्भ हा एकेकाळी रिपब्लिकन पक्षाचा गड होता. परंतु सध्या येथे बसपाने आपली ताकद वाढवली आहे. महाराष्ट्राचा विचार केला तर बसपाची संपूर्ण शक्ती ही विदर्भातच एकवटली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केल्यास बसपाने राज्यभरात २८१ उमेदवार उभे केले होते. त्यांना एकूण ११ लाख ९१ हजार ७४९ इतकी मते मिळाली होती. राज्यातील एकूण मतांपैकी २.३० टक्के इतकी मते बसपाने घेतली होती. यात एकट्या विदर्भातून ६ लाख ८७ हजार ७८३ (७.९० टक्के) इतकी मते मिळाली होती. तेव्हा विदर्भातून ६१ उमेदवार बसपाने निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. यापैकी ४ उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर तर १६ उमेदवार हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यातही नागपुरातील उत्तर नागपूर आणि उमरेड येथील उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे बसपाने पुन्हा एकदा विदर्भावर फोकस करण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे वादळ उठले. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वातील वंचित बहुजन आघाडीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्याची झलकही दाखवून दिली. वंचितच्या उमेदवारांनी तब्बल ४१ लाखावर मते घेतली. याचा फटका अर्थातच बसपाला बसला. परंतु विदर्भात विशेषत: पूर्व नागपुरात वंचितचा फारसा प्रभाव दिसून आलेला नाही. त्यामुळे बसपाने विदर्भाचा हा आपला गड कायम राखण्यासाठी कंबर कसली आहे.उत्तर नागपुरातून खाते उघडण्यासाठी कसली कंबरगेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये बसपाचे चार उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. यात नागपुरातील दोन मतदार संघाचा समावेश आहे. एक उत्तर नागपूर तर दुसरा उमरेड. यामुळे यंदा कुठल्याही परिस्थितीत बसपाचा उमेदवार निवडून आणायचा आणि खाते उघडायचे, यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. त्यामुळेच उत्तर नागपूरमधून स्वत: प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे मैदानात उतरले आहेत. बसपाच्या अध्यक्षा मायावती यांनीसुद्धा राज्यात एकमेव सभा घेतली ती सुद्धा उत्तर नागपुरातच. बसपाचे तब्बल १० नगरसेवक असून, ते सर्व उत्तर नागपुरातील आहेत. त्यामुळे बसपाचे खाते उत्तर नागपुरातून उघडण्यासाठी कधी नव्हे इतकी चांगली संधी यंदा दिसून येत आहे.नागपुरातील १२ पैकी २ दुसऱ्या तर ६ विधानसभेत तिसऱ्या क्रमांकावरबसपाच्या राजकीय ताकदीचा अंदाज यावरूनच दिसून येतो, की २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत नागपुरातील १२ विधानसभा मतदार संघापैकी उत्तर नागपूर व उमरेड या दोन मतदार संघात बसपाचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर ६ मतदार संघात बसपाचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. यात उत्तर नागपूरमधून किशोर गजभिये हे ५५,१८७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर उमरेडमधून रुक्षदास बंसोड ३४,०७७ मते घेऊन दुसऱ्या क्रमांकावर राहिले. सावनेरमधून बसपाचे उमेदवार सुरेशबाबू डोंगरे यांनी ११,०९७, नागपूर दक्षिण पश्चिममधून डॉ. राजेंद्र पडोळे यांनी १६,५४०, नागपूर दक्षिणमधून सत्यभामा लोखंडे यांनी २३,१५६, नागपूर पूर्वमधून दिलीप रंगारी १२,१६४, मध्य नागपुरातून ओंकार अंजीकर ५५३५ आणि नागपूर पश्चिममधून अहमद कादर १४,२२३ मते घेऊन तिसºया क्रमांकावर राहिले. हिंगणा येथून भदंत महापंत यांनी १९,४५० मते घेतली होती. ते चौथ्या क्रमांकावर राहिले.
Maharashtra Assembly Election 2019 : बसपाची पुन्हा विदर्भाकडूनच अपेक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:52 PM
बसपा राज्यातील २८८ पैकी २६४ जागा लढवीत आहे. परंतु पक्षाचा गड समजल्या जाणाऱ्या विदर्भावर पुन्हा एकदा फोकस केला आहे. येथील सर्व जागा बसपा लढवत असून, त्यांना विदर्भाकडूनच अपेक्षा आहे.
ठळक मुद्देगेल्या वेळी ४ उमेदवार दुसऱ्या तर १६ उमेदवार तिसऱ्या क्रमांकावरमायावती यांची राज्यातील एकमेव सभा केवळ नागपुरात