लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज्याची जबाबदारी असली तरी त्यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. मागील पाच वर्षांत येथील विकासकामांचा नियमित आढावा घेत मतदारसंघात पक्ष संघटन मजबूतीवरदेखील भर दिला. शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले.२००९ साली विधानसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघाची पुनर्रचना झाली. तेव्हापासून भाजपकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस हेच येथून उमेदवार आहेत. त्यांची ही पाचवी निवडणूक राहणार आहे. दोनवेळा ते पश्चिम नागपुरातून निवडून आले होते व २००९, २०१४ मध्ये दक्षिण-पश्चिममधून त्यांनी विजय मिळविला. मागील निवडणुकीत तर त्यांनी ५८ हजारांहून अधिक मतांनी विजयी होत नागपुरातून सर्वाधिक मताधिक्य मिळविण्याचा मान पटकाविला होता. २०१४ सालापासून पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी कामाचा व्याप असतानादेखील या मतदारसंघाकडे जातीने लक्ष ठेवले. शिवाय स्थानिक भाजप नेत्यांकडे येथील मतदारांशी कायम संपर्क साधण्याची जबाबदारी होतीच. त्यामुळे मतदारांशी भाजप कायम ‘कनेक्ट’ राहिला.मुख्यमंत्र्यांकडे राज्यभरातील प्रचाराची जबाबदारी असल्यामुळे ते स्वत:च्या मतदरासंघात प्रचाराला फारसे येऊ शकलेले नाहीत. परंतु पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ही जबाबदारी घेतली असून प्रचारादरम्यान विकासकामांवरच भर देण्यात येत आहे. मागील पाच वर्षांत दक्षिण-पश्चिम नागपुरात झालेली विकासकामे घेऊनच ते मतदारांपर्यंत जात आहेत.या मतदारसंघात सिमेंट रस्त्यांचे जाळे विणल्या गेले आहे. शिवाय जागोजागी ‘सीसीटीव्ही’ लावण्यात आले आहेत. या मतदारसंघात झोपडपट्टीदेखील मोठ्या प्रमाणात आहे. येथील झोपडपट्टीवासीयांना मालकी हक्क पट्टे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. ‘स्मार्ट सिटी’अंतर्गत १ हजार २ कोटींचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. यापैकी आतापर्यंत ३८३ कोटी रुपये मिळाले असून याअंतर्गत दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात अनेक कामे करण्यात आली आहेत. २४ बाय ७ योजनेचे कामदेखील ७५ टक्क्यांहून अधिक पूर्ण झाले आहेत. मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून २१० कोटींची कामे सुरू आहेत. यात पावसाळी नाली, वाचनालय, सिमेंट मार्ग, इन्डोअर स्टेडियम, मैदान-उद्यान विकास इत्यादींचा समावेश आहे. मतदारसंघात १५ ठिकाणी ‘वॉटर एटीएम’ लावण्यात आले आहेत. हे ‘एटीएम’ महिला बचत गटांना हस्तांतरित करण्यात आले आहे. याच बाबी घेऊन आमचे कार्यकर्ते मतदारांपर्यंत जात आहेत, अशी माहिती भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.‘समाधान’ला नागरिकांचा प्रतिसादशिवाय नागरिकांची प्रशासकीय कामे व्हावी यासाठी प्रथमच मतदारसंघात समाधान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला. याशिवाय आरोग्य शिबिरांचेदेखील आयोजन करण्यात आले. अटल आरोग्य महाशिबिराच्या माध्यमातून ४२ हजार १५५ रुग्णांवर उपचार करण्यात आले. एकाच ठिकाणी इतक्या संख्येत रुग्णांच्या तपासणीचा हा शहरातील पहिलाच उपक्रम होता, अशी माहिती मनपाचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी दिली.आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकासडॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, ‘मिहान’ यासाठी १ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर सार्वजनिक-खासगी भागीदारीने आंतरराष्ट्रीय हब विमानतळ विकसित करण्यात येत आहे. यात नवीन ‘टर्मिनल’ इमारती, दुसरी धावपट्टी, नवीन अग्निशमन यंत्रणा, एटीसी टॉवर इत्यादींचा समावेश असेल. हा प्रकल्प १ हजार ६८५ कोटी रुपयांचा असून यासाठी निधी कमी पडणार नाही, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी अगोदर जाहीर केली आहे.जातीपातींच्या पलिकडे जाऊन विकासदक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात सर्वच जातीधर्माचे लोक राहतात. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण मतदारसंघाच्या विकासावरच भर दिला. जातीपातींच्या चौकटीत त्यांनी विकासाला न अडकविता प्रत्येकाचे समाधान करण्यावरच भर दिला. बहुजन समाजासाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली, असे ‘एनएमआरडीए’चे सदस्य विजय राऊत यांनी सांगितले.
Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांनी 'होमपीच'ला केले 'स्मार्ट'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 10:06 PM
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शहरासोबतच ‘होमपीच’लादेखील त्यांनी ‘स्मार्ट’ करत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आणखी जोमाने काम करण्यासाठी प्रोत्साहनच दिले.
ठळक मुद्देदक्षिण-पश्चिममध्ये सर्वांगिण विकासावर भरभाजप पदाधिकाऱ्यांना दिले प्रोत्साहन