लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले. राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख (काटोल), काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत (उत्तर नागपूर), आशीष देशमुख (दक्षिण-पश्चिम), जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर (कामठी), उदयसिंग यादव (रामटेक), बंटी शेळके (मध्य नागपूर), पुरुषोत्तम हजारे (पूर्व नागपूर) आदींनी अर्ज दाखल केले.नागपूर शहरात भाजपाची रॅली निघाल्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ता संविधान चौकात एकत्र झाले. काही वेळात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन राऊत हे माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यासोबत संविधान चौकात पोहचले. यावेळी माजी मंत्री विनोद गुडधे पाटील, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. त्यावेळी मध्य नागपूरचे उमेदवार बंटी शेळके यांचे कार्यकर्तेही पोहचले. नगरसेवक प्रफुल्ल गुडधे पाटील, मनपाचे विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, नरेंद्र जिचकार, जिया पटेल आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काही वेळ वाद्यांचा गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दरम्यान कार्यकर्त्यांना माहीत पडले की, बंटी शेळके व पूर्व नागपूरचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे उमेदवारी भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात परस्पर पोहचले. त्यामुळे राऊत आणि चतुर्वेदी सुद्धा रॅली न काढता जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. त्याच दरम्यान दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार आशिष देशमुख सुद्धा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले. दरम्यान, शहरअध्यक्ष विकास ठाकरेही पोहचले.काँग्रेस उमेदवारांनी केला विजयाचा दावाभाजपा सरकारने जनतेला दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. एकही नवीन उद्योग विदर्भात आला नाही. विकासाच्या मुद्यावरही भाजपा अपयशी ठरली आहे. त्यामुळे काँग्रेस या निवडणुकीत आपले जुने वैभव परत मिळवेल, असा दावा काँग्रेसच्या उमेदवारांनी केला.
Maharashtra Assembly Election 2019: नागपुरात काँग्रेस- राष्ट्रवादीही जोशात : रॅली न काढता पोहोचले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 11:37 PM
उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले.
ठळक मुद्देराऊत, देशमुख, भोयर, शेळके, हजारे आदींचे अर्ज