लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या देशाला सत्य, अहिंसा व सर्वधर्मसमभावाचा राष्ट्रवाद दिला. तर दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा देशाला तेडणारा राष्ट्रवाद आहे. देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. नितीन राऊ त यांच्या प्रचारार्थ गुलशननगर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, अनिस अहमद, अतुल लोंढे, शब्बीर विद्रोही यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भूपेश बघेल म्हणाले, गांधीजींनी देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांना जोडण्याचे काम केले. त्यांच्याच राष्ट्रवादावर काँग्रेस पक्ष चालतो. दुसरीकडे संघाचा राष्ट्रवाद भारतात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात दहशतीचे वातारण आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेसला सवाल करताहेत की, तुम्ही कलम ३७० हटवाल की नाही. वास्तविक भाजपाच्या जाहीरनाम्यातच याचा समावेश होता. आम्ही छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व धानाला प्रति क्विंटल २५०० रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते. काँग्रेसची सत्ता येताच आम्ही ते पूर्ण केले.विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे महाराष्ट्रात आले. ते आपल्या भाषणातून कलम ३७० हटविल्याचे सांगत आहेत. परंतु शेतकऱ्यांच्या आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडणारे उद्योग यावर बोलायला तयार नाहीत. निवडणुका महाराष्ट्रातील असल्याने येथील प्रश्नावर बोलणे अपेक्षित आहे. भाजपाने लोकसभा निवडणुकीत दरवर्षी दोन कोटी रोजगार व प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख जमा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आज ते यावर बोलायला तयार नसल्याचे बघेल म्हणाले.नोटाबंदी केली, पण किती पैसा जमा झाला, हे सांगायला मोदी तयार नाहीत. पुलवामाच्या नावाने मते मागतात, पण जवानांच्या मृत्यूला जबाबदार कोण? २५० किलोगॅ्रम आरडीएक्स कसे आले, याचे उत्तर का देत नाही, असा सवाल बघेल यांनी केला. नितीन राऊ त म्हणाले, उत्तर नागपूरच्या विकासाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष आहे. त्यामुळे परिवर्तनाशिवाय पर्याय नसल्याने मला सेवेची संधी द्या. दोनदा जनरेटर बंद पडल्याने काही वेळ सभास्थळी अंधार होता.
Maharashtra Assembly Election 2019 : देश विभाजनाने नव्हे,जोडण्याने चालतो : भूपेश बघेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:02 PM
देश विभाजनाने नव्हे तर जोडण्याने चालतो. म्हणूनच देशाला आज गांधीजींच्या राष्ट्रवादाची गरज असल्याचे प्रतिपादन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सोमवारी केले.
ठळक मुद्देगांधीजींचा राष्ट्रवाद हवा की संघाचा?