लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगांना आपल्या देशात प्रचंड महत्त्व आहे. या उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे व त्या दिशेने काम सुरू आहे. या उद्योगांतून पुढील पाच वर्षांत देशभरात पाच कोटी रोजगारांची निर्मिती करणाचा मी संकल्पच घेतला असून तशी पावलेदेखील उचलली जात आहे, असे प्रतिपादन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी केले. दक्षिण नागपुरातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेदरम्यान ते बोलत होते.दिघोरी येथे आयोजित या सभेला आ. अनिल सोले, आ. सुधाकर कोहळे, भाजपाचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, शिवसेना नेते शेखर सावरबांधे प्रामुख्याने उपस्थित होते. मागील पाच वर्षांत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात प्रचंड विकास कामे झाली आहेत. सिंचनासाठी प्रचंड कामे झाली व निधीदेखील मिळाला. हे सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर राज्यातील सिंचन ५० टक्क्यांवर जाईल व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे गडकरी म्हणाले. फडणवीस यांच्या नेतृत्वात नागपूरनेदेखील कात टाकली असून विकासाकडे वेगाने वाटचाल सुरू आहे. अजनीला आम्ही जगातील सर्वोत्तम रेल्वेस्थानक म्हणून विकसित करू. येथे ‘मल्टिमॉडेल हब’ विकसित होत असून, सर्व बसेसदेखील येथूनच सुटतील. शिवाय रेल्वेचा कारखाना विदर्भात सुरू होत असून, त्यामुळे रोजगारनिर्मिती होईल,असेदेखील ते म्हणाले.काँग्रेस नेत्यांना ‘करंट’ लावाकाँग्रेसचे नेते हिरवं दिसलं तिकडे धावतात. शेवटी मीच देवेंद्र फडणवीस यांना म्हटल की पक्षाचे कुटुंबनियोजन करा. नाही तर आमचेच नेते नाराज होतील. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यकाळात शाळा-महाविद्यालय उघडली. आता त्यांना निकालातून ‘करंट’ लावा, असे गडकरी म्हणाले.मला म्हातारा करू नकाआपल्या भाषणादरम्यान अनेक नेते मला पितृतुल्य म्हणतात. काही दिवसांअगोदर चित्रपट अभिनेते खा. सनी देओल यांच्याशी भेट झाली. त्यांनी सांगितले की, ते माझ्याच वयाचे आहे. जर सनी देओल हिरो असेल तर मीदेखील हिरोच आहे. मला पितृतुल्य म्हणून म्हातारा करू नका, अशी कोपरखळी गडकरी यांनी मारली.
Maharashtra Assembly Election 2019 : सूक्ष्म-लघु उद्योगातून पाच कोटी रोजगार निर्माण करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 12:46 AM