Maharashtra Assembly Election 2019 : महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात सरकार नापास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:08 AM2019-10-19T00:08:27+5:302019-10-19T00:09:40+5:30
महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील पाच वर्षात राज्यात आणि देशात महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत प्रचंड वाढ झाली असून, गुन्हे रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. महिला सुरक्षा आणि महिला सक्षमीकरणात हे सरकार पूर्ण नापास झाले आहे, असा आरोप काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी शुक्रवारी केला.
नागपुरात आल्या असता त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, २०१२ मध्ये निर्भया कांड घडले. या घटनेनंतर तातडीने तपास करून गुन्हेगारांचा शोध लावण्यात आला. आयोगाची स्थापना केली. कडक कायदा आणला. न्यायदानात विलंब होऊ नये म्हणून फास्ट ट्रॅक कोर्टची स्थापना केली. त्यानंतर नवीन सरकार आले. मात्र या कांडातील गुन्हेगारांना अद्याप शिक्षा झालेली नाही.
२०१४ नंतर महिलांवरील अन्याय, अत्याचारात वाढ झाल्याचा आरोप करून मुखर्जी म्हणाल्या, २०१३ मध्ये बलात्काराच्या घटनांची संख्या १ हजार ५४६ होती. ती २०१८ मध्ये ४ हजार ७६ वर पोहचली. महाराष्ट्रात मुलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यांतही वाढ झाली. बेटी बचाव बेटी पढाव ही घोषणा या सरकारने केली, त्या जाहिरातीसाठी स्वत:च्या छायाचित्रांचे पोस्टर देशभर लावले, पण एकाही पोस्टरवर त्याअंतर्गत असलेल्या कायद्याची आणि गुन्ह्यांची माहिती जनतेला दिली नाही. ९२८ कोटी रुपयांची तरतूद या योजनेवर सरकारने केली, त्यातील फक्त १९ टक्के निधी राज्याला मिळाला आणि ४० टक्के निधी जाहिरातीवर खर्च केला. हे सरकार जाहिरातबाज आणि घोषणाबाज असल्याचा आरोप त्यांनी केला. त्या म्हणाल्या, उन्नाव प्रकरणात भाजपातील ज्येष्ठ नेत्याचे नाव येऊनही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आणि अटक करण्यात या सरकारने विलंब का केला, याचे उत्तर जनतेला द्यावे. चिन्मयानंद यांच्याविरुद्ध तक्रारकर्तीच्या आरोपांमध्ये स्पष्ट उल्लेख असतानाही थेट बलात्काराची कलमे न लावता तसा प्रयत्न केल्याची कलमे लावली आहेत. गुन्हे दाखल करण्यात टाळाटाळ का, याचे उत्तर भाजपाने देशाला द्यावे.