लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : २२ वर्षांपूर्वी नागपूर सोडून इटलीत स्थायिक झालेले माई गुरुजी ऊर्फ महेंद्र सिरसाट यांनी सोमवारी महापालिकेच्या मतदान केंद्रावर मतदान केले. मतदान करण्यासाठी इटलीहून नागपूर गाठणाऱ्या माई गुरुजी यांनी शहराचा झालेला कायापालट पाहून मतदान करताना गर्वाची अनुभूती होत असल्याची भावना लोकमतजवळ व्यक्त केली.ईटलीतील लोकांना भारतीय संस्कृती शिकविणारे माई गुरुजी हे त्या देशात भारताचे युवा गुरू म्हणून प्रसिद्ध आहेत. २२ वर्षांपूर्वी त्यांनी नागपूर सोडले होते व थेट इटली गाठली. तेथे संघर्ष करीत आध्यात्मिक गुरू म्हणून नाव कमावले. माई गुरुजी दरवर्षी तेथील लोकांना भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविण्यासाठी त्यांना घेउन भारतात येतात. नागपूरला सीताबर्डी येथे त्यांचे घर आहे. त्यांची पत्नी इटालियन आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळीही ते कुटुंबासह दिवाळी सणासाठी २५ आॅक्टोबरला नागपूरला येणार होते. मात्र निवडणूक असल्याची माहिती मिळताच १७ तारखेलाच नागपूर गाठले. पत्नी व त्यांचा मुलगा २५ रोजी येणार असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा मतदानही केले. आपल्या शहराचा कायापालट झाला आहे आणि हे दृश्य पाहून गर्व वाटत असल्याची भावना व्यक्त केली. बºयाच वर्षाने भारतातील निवडणुकीचा अनुभव घ्यायचा होता आणि त्या कारणाने पहिल्यांदा मतदान केल्याचाही आनंद झाल्याचे ते म्हणाले. आपण इटलीहून येऊन मतदान केले, मात्र शहरात केवळ ५१ टक्के मतदान झाल्याची बातमी पाहून मतदानाविषयी लोकांच्या उदासीनतेबाबत खंत वाटत असल्याचीही भावना व्यक्त केली.
Maharashtra Assembly Election 2019 : मतदानासाठी इटलीहून आले माई गुरुजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 12:18 AM
२२ वर्षांपूर्वी नागपूर सोडून इटलीत स्थायिक झालेले माई गुरुजी ऊर्फ महेंद्र सिरसाट यांनी सोमवारी महापालिकेच्या मतदान केंद्रावर मतदान केले.
ठळक मुद्देबदललेले नागपूर पाहून गर्व : आयुष्यात पहिल्यांदा केले मतदान