लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मतदानाच्या दिवशी उमेदवार आपला मंडप उभारून स्वत:च्या नावासह चिन्ह असलेला फलक लावू शकतात. मात्र निवडणूक आयोगाने फलक आणि मंडपाचाही आकार ठरविला आहे.मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राजवळ आपले बूथ लावण्याचा उमेदवारांचा प्रयत्न असतो. मात्र त्यासाठी यावेळी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. त्यानुसार, मतदान केंद्रापासून २०० मीटरवर या मंडपाला परवानगी देण्याची तरतूद आहे. या मंडपामध्ये फक्त एक टेबल आणि दोन खुर्च्या एवढेच असावे, तिथे बसलेल्या दोन व्यक्तींना संरक्षण मिळावे यासाठी छत्रीची किंवा ताडपत्री अथवा कापडाच्या तुकड्याची सोय असावी, असे सांगितले आहे. या मंडपामध्ये बूथवरील उमेदवाराचे आणि पक्षाचे नाव निवडणूक चिन्ह दिसेल, असा एक कापडी फलक लावण्याची मुभा दिली आहे. मात्र या फलकाचा आकार तीन बाय साडेचार फुटाचाच असावा, अशाही सूचना निवडणूक आयोगाच्या आहेत. या मंडपासमोर गर्दी होणार नाही, याची दक्षताही संबंधितांना घ्यावी लागणार आहे.असा मंडप उभारण्यासाठी संबंधित शासकीय अधिकारी किंवा प्राधिकाऱ्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. पोलीस अधिकारी किंवा निवडणूक अधिकाऱ्यांनी मागणी केल्यावर मंडपाची व्यवस्था पाहणाऱ्या व्यक्तीकडे ही परवानगी असावी लागणार आहे.राजकीय पक्षाने एखाद्या क्षेत्रामध्ये मंडप उभारला नसेल तर मतदारांना यादीतील नावे दर्शविण्यासाठी मतदार सहायता मंडपात व्यवस्था करता येते. मात्र त्यासाठी आधी आपली असमर्थता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे कळविणे आवश्यक आहे.
Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक मंडपात उमेदवार लावू शकणार चिन्हासह नावाचा फलक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 10:48 PM