लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले. या घडामोडीमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ निर्माण झाली असतानाच, दुसऱ्या एका पथकाने गणेश टेकडी मंदिराजवळच्या मानस चौकात २५ लाखांची रोकड ताब्यात घेतली.निवडणुकीच्या काळात मतदारांना प्रभावित करण्यासाठी पैशाचा वापर होतो. काळे धनही मोठ्या प्रमाणात बाहेर काढले जाते. ते ध्यानात घेत हा गैरप्रकार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने भरारी पथक, सतर्कता (एसएसटी) पथकांची नियुक्ती केली आहे. या विशेष पथकांमध्ये निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत पोलिसांचाही समावेश आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करून ते वाहनांची, वाहनधारकांची तपासणी करतात. असेच एक पथक पाचपावली उड्डाणपुलावर सोमवारी दुपारी ३.३० वाजता नाकाबंदी करीत होते. त्यांना एक स्वीफ्ट कार भरधाव वेगाने येताना दिसली. त्यात चालकासह चार व्यक्ती होते. कारची तपासणी केली असता त्यात भलीमोठी रोकड आढळली. त्यामुळे कारमधील व्यक्तींना कारसह पाचपावली ठाण्यात नेण्यात आले. ठाणेदार अशोक मेश्राम यांनी लगेच निवडणूक निर्णय अधिकारी (रिटर्निंग ऑफिसर) तसेच प्राप्तिकर खात्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यामुळे दोन्ही विभागाचे अधिकारी पाचपावली ठाण्यात पोहचले. त्यांनी नोटा मोजण्याची मशीनही सोबत आणली. रात्री ८ वाजेपर्यंत नोटा मोजण्याचे काम सुरू होते. सूत्रांच्या माहितीनुसार, ही रोकड ७२ लाख रुपये भरल्याचे समजते. एका राजकीय पक्षाची ही रक्कम असल्याची जोरदार चर्चा पोलीस ठाण्याच्या आवारात केली जात होती. दरम्यान, ही रोकड लॉजिकेश सोल्युशन कंपनीची असून, ही कंपनी वेगवेगळ्या ग्राहकांकडून रक्कम जमा करून ती बँकेत जमा करण्याची जबाबदारी पार पाडते. एटीएममध्ये रक्कम जमा करण्याचेही काम करते. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आज नेहमीप्रमाणे वीज मंडळाच्या कलेक्शन सेंटरवरून ही रोकड जमा केली आणि ती स्टेट बँकेच्या मुख्यालयात जमा करण्यासाठी निघाले असताना नाकाबंदीदरम्यान त्यांना पकडल्याचे काही जण पोलीस ठाण्यात सांगत होते.या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असतानाच दुसऱ्या एका पथकाने टेकडी गणेश मंदिराजवळच्या मानस चौकात आज रात्री ७ च्या सुमारास २५ लाख रुपयांची रोकड ताब्यात घेतली. ओला कारमधून दोन व्यक्ती ही रोकड नेत होते. त्यांना सीताबर्डी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. वृत्त लिहिस्तोवर चौकशी सुरू असल्याचे पोलीस सांगत होते.तीन दिवसांत एक करोड११ ऑक्टोबरला पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्रातील वाठोडा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या प्रजापती चौक येथे एका वाहनातून २ लाख ३८ हजारांची रोकड पकडण्यात आली होती. अशा प्रकारे तीन दिवसांत १ कोटी रुपये सापडल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात भरारी पथकाने पकडले एक करोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 10:20 PM
निवडणुकीच्या काळात पैशाचा होणारा संभाव्य गैरवापर ध्यानात घेऊन निवडणूक आयोगाने नेमलेल्या विशेष पथकांपैकी एका पथकाने पाचपावलीत एका कारमधून ७२ लाख जप्त केले.
ठळक मुद्देदोन ठिकाणी सापडली रोकड : पाचपावली आणि सीताबर्डीत चौकशी सुरू