लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदार संघात एकूण २०५ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले होते. त्यापैकी छाननीमध्ये एकूण २८ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. यात राजकीय पक्षांतील उमेदवारांचाही समावेश आहे. नागपूर पश्चिम मतदार संघातून सर्वाधिक ५ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले असून येथे आता वंचित बहुजन आगाडीचा उमेदवार रिंगणात नसेल. सोमवार ७ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा निवडणुकीच्या रिंगणात नेमके किती उमेदवार शिल्लक राहतात, याचे चित्र स्पष्ट होईल.अर्जाच्या छाननीनंतर शनिवारी १७८ उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली. तर २८ अवैध ठरली. यात यात सर्वाधिक नागपूर पश्चिम मतदार संघातील ६ उमेदवार अर्ज अवैध ठरल्याने निवडणुकीच्या रिंंगणातून बाद झाले. त्यानंतर नागपूर दक्षिण पश्चिम, हिंगणा, सावनेर, कामठी आणि उत्तर नागपूर विधानसभेतून प्रत्येकी ३ उमेदवारांचे अर्ज रद्द झाले. तर रामटेक, उमरेड व काटोल मतदार संघातील प्रत्येकी दोन उमेदवार आणि नागपूर दक्षिण मतदार संघातील एका उमेवाराचा अर्ज अवैध ठरला. पूर्व आणि मध्य नागपुरातील एकाही उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला नाही, हे विशेष.छाननीत बाद झालेले उमेदवारनागपूर दक्षिण-पश्चिम : राकेश महेश गजभिये (बसपा) , विलास श्रीराम सुर्यवंशी (अपक्ष), सर्वजित ताराचंद चहांदे (अपक्ष)नागपूर दक्षिण : नरेंद्र यशवंत अतकर (अपक्ष)नागपूर उत्तर : पराग भाऊराव जंगम (अपक्ष), जितेंद्र भस्कर घोडेस्वार (बसपा), बुद्धम बाबुराव राऊत (बसपा)नागपूर पश्चिम : सोनू प्रभाकर चहांदे ( वंचित बहुजन आघाडी), मनोज भीमराव गजभिये (बसपा), उमेश नामदेवराव टेकाम (गोंडवाना गणतंत्र पार्टी), साहिल बालचंद्र तुरकर (भारतीय मानवाधिकार फेडरल पार्टी), इलियास गुलजार खान (एमपीडी), विक्रांत चंद्रकांत ओगले (अपक्ष)
उमरेडमध्ये दोघांचे अर्ज अवैध उमरेड विधानसभा मतदार संघात शनिवारी छाननी अंती दोन अर्ज अवैध ठरले. यामध्ये स्वप्निल जामसुगंध खोब्रागडे आणि जॉनी शलिकराम मेश्राम यांचा समावेश आहे. खोब्रागडे यांनी भाजप पक्षाचा उल्लेख करीत अर्ज सादर केला होता. उमेदवारी अर्ज सादर करताना त्यांनी पक्षाचा एबी फार्म जोडलेला नव्हता. सोबत १० प्रस्तावक दिले नाहीत यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. जॉनी मेश्राम यांनीही १० प्रस्तावक दिले नाही. मूळ निवासी पत्ता असलेले दस्तऐवज जोडले नाहीत. दोन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरल्याने आता छाननीअंती १५ उमेदवार रिंगणात आहेत.
सावनेरमध्ये तिघांचे अर्ज अवैध सावनेर विधानसभा मतदार संघात १३ उमेदवारांनी १६ नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. यातील तीन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरले. त्यामुळे सध्या येथे निवडणूक रिंगणात १३ उमेदवार आहेत. शनिवारी उमेदवारी अर्ज रद्द झालेल्यात अनुजा सुनील केदार (कॉँग्रेस) आणि सोनबा मुसळे (भाजप), अनिल बोडाखे (बहुजन मुक्ती पार्टी) यांचा समावेश आहे. या तिघांनी त्यांच्या पक्षाकडून डमी उमेदवार म्हणून अर्ज केले होते. त्यांच्या अर्जासोबत पक्षाचे अधिकृत ‘बी’फार्म नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
हिंगण्यात तिघांचे अर्ज अवैध हिंगणा मतदार संघात १६ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. देवेंद्र रामकृष्ण कैकाडे (बसपा) आणि नरेंद्र राजाराम मेंढे (बसपा) यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरविण्यात आले. त्यांनी अर्जासोबत पक्षाचे ‘बी’ फॉर्म जोडलेले नव्हते. यासोबतच मोरेश्वर डोमाजी बागडे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु शपथपत्रातील अपूर्ण माहिती मुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यामुळे आता येथे १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
कामठीत तिघांचे अर्ज अवैधकामठी विधानसभेत १८ पैकी ३ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहे. यात ज्योती बावनकुळे (भाजप) आणि अनिल निधान (भाजप) यांचा समावेश आहे. या दोघांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरले आहेत. ज्योती बावनकुळे यांच्या अर्जासोबत पक्षाचा ‘एबी’ फार्म जोडण्यात आला नव्हता. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरला आहे. माझ्या पत्नीने अपक्ष उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरला नाही, त्याला ‘एबी’ फार्म नसल्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरेल, असे शुक्रवारीच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले होते. यासोबत अनिल निधान यांच्या एबी फॉर्मवर भाजने दुसऱ्या क्रमांकाचा पसंतीक्रम टाकल्याने त्यांचाही अर्ज अवैध ठरला आहे. या मतदार संघात भाजपने टेकचंद सावरकर यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यांचा अर्ज छाननी अंती वैध ठरला आहे.
काटोलमध्ये दोघांचे अर्ज अवैध काटोल मतदार संघात १३ पैकी दोन उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणामुळ अवैध ठरले. यात प्रवीण बबनराव लोहे (भाजप) आणि रुपराव वामन नारनवरे (बसपा) समावेश आहे. या दोघांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे अधिकृत एबी फॉर्म जोडले नव्हते.
रामटेकमध्ये तीन अर्ज अवैध रामटेकमध्ये तीन उमेदवारी अर्ज छाननी अंती अवैध ठरले. यात चंद्रपाल चौकसे (काँग्रेस) यांचा समावेश आहे. चौकसे यांनी उमेदवारी अर्जासोबत पक्षाचा ‘एबी’ फार्म जोडलेला नव्हता. त्यामुळे तो अवैध ठरला. चौकसे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून सादर केलेला अर्ज मात्र वैध ठरला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात ते कायम आहेत. पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रटीक) यांचा अर्जही अवैध ठरला आहे. त्यांच्या उमेदवारी अर्जात १० सूचकांच्या स्वाक्षऱ्या असणे आवश्यक होते. पण तिथे एकच स्वाक्षरी असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. यासोबतच अपक्ष उमेदवार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोणेकर यांचाही अर्ज तांत्रिक कारणामुळे अवैध ठरल्या. त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अपूर्ण माहिती असल्याने तो अवैध ठरला.