Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:18 PM2019-10-16T23:18:17+5:302019-10-16T23:19:24+5:30
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महात्मा गांधी यांच्या १५० व्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते.
भाजपने आपल्या जाहीरनाम्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याचे आश्वासन दिले आहे. यावरून बराच गदारोळ सुरू आहे. काँग्रेसकडून टीका केली जात आहे. रविशंकर प्रसाद यांनी आज या मुद्यावर काँग्रेसवर टीकाही केली. या टीकेबाबत पत्रकारांनी मनीष तिवारी यांना छेडले असता त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या लढ्यात कुठलेही योगदान न देणारे आज देशभक्ती शिकवत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. यावेळी खा. तिवारी यांनी भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरल्याचे सांगितले. भाजपने पाच वर्षांत खरंच चांगले काम केले तर मग ते त्या कामावर मत का मागत नाहीत. त्यांना भावनात्मक मुद्यांची गरज का पडत आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या १० वर्षांच्या काळात दोन मोठे जागतिक आर्थिक संकट ओढवले होते. परंतु त्याची साधी झळसुद्धा भारताला पोहचू दिली नव्हती. परंतु मोदी यांच्या केवळ पाच वर्षांत कुठलीही जागतिक मंदी नसताना भारताची अर्थव्यवस्था संकटात सापडली. ही मानवनिर्मित आहे. मुळात मोदी सरकारला अर्थव्यवस्था चालवताच येत नाही, अशी टीकाही खा. तिवारी यांनी केली.
जनतेचा पैसा बँकेत सुरक्षित नाही
जनतेचा मेहनतीने कमावलेला पैसा आज बँकेत सुरक्षित नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ज्या देशातील नागरिकांचाच पैसा सुरक्षित नाही, तिथे आमची गुंतवणूक सुरक्षित कशी राहील, या विचाराने कुणीही भारतात गुंतवणूक करायला तयार नाही. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांना जनतेने आळा घातला नाही तर देशाची अर्थव्यवस्था इतकी डबघाईस जाईल की मग ती रुळावर येऊ शकणार नाही? अशी भीतीही खा. मनीष तिवारी यांनी वर्तविली.