लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील पाच वर्षांत स्वच्छ प्रतिमेसह पारदर्शकपणे राज्यकारभार केला आहे. जनतेसमोर आम्ही केलेली कामे आहेत. विशेषत: गोरगरीब, वंचितांच्या हितासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या हक्काच्या घराचे महत्त्व असते. त्यामुळे २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे व तो पूर्ण करूनच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. शनिवारी मुख्यमंत्र्यांनी नागपूर शहरातील तीन मतदारसंघांमध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी झंझावाती सभा घेतल्या. यावेळी ते बोलत होते.विशेष म्हणजे दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघात स्वत:च्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रथमच सभा घेतली. टिंबर मार्केट येथे ही सभा झाली. आघाडी शासनाच्या काळापेक्षा मागील पाच वर्षांत दुप्पट काम केले. याबाबतीत तर मी विरोधकांना आमोरेसामोरे येऊन चर्चेचे आव्हानच देतो. विधानसभा निवडणुकांसाठी आम्ही पूर्ण तयारीनिशी उतरलो आहोत. परंतु या निवडणुकीत मजाच नाही. पाच वर्षांच्या मुलालादेखील निकाल काय येणार हे माहीत आहे. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष हताश व निराश झाले आहेत. आता त्यांनी आमच्या विरोधात उमेदवारही दमदार उतरविले नाहीत. लोकसभा निवडणुकांच्या वेळी नितीन गडकरी यांच्याविरोधात व आता माझ्याविरोधात पळपुटेच उमेदवार उतरविले आहेत. हे उमेदवार कधीच जनतेत जात नाहीत. ते तक्रारी करतात व केवळ तांत्रिकदृष्ट्या निवडणूक लढतात. १०० कोल्हे मिळूनदेखील वाघाची शिकार करु शकत नाही. या विधानसभा निवडणुकांत नागपूरचे अगोदरचे सर्व रेकॉर्ड तुटतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, मनपातील सत्तापक्ष नेते संदीप जोशी, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव, ‘बरिएमं’च्या नेत्या सुलेखा कुंभारे, भाजप प्रदेश प्रवक्त्या अर्चना डेहनकर यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते. पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांच्या प्रचारासाठी दाभा तर दक्षिण नागपूर विधानसभा क्षेत्रातील भाजपचे उमेदवार मोहन मते यांच्या प्रचारासाठी उदयनगर चौक येथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली.म्हणून पवारांना नागपूरची भीती वाटतेमुख्यमंत्र्यांनी यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनादेखील चिमटे काढले. पवार म्हणतात की नागपूर हे गुंडांचे शहर आहे. परंतु एका सामान्य मनुष्याने त्यांची अवस्था इतकी वाईट केली आहे व त्यामुळेच त्यांना नागपूरचा प्रत्येकच नागरिक गुंड वाटतो आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात आघाडीच्या जागा घटणार हे राहुल गांधी यांना माहीत आहे. म्हणूनच ते प्रचाराला येण्याचे टाळत आहेत, असेदेखील ते म्हणाले.दक्षिण-पश्चिम नागपूरने मला मोठे केलेआपल्या गृह मतदारसंघातून लढण्याचा निर्णय का घेतला यावर मुख्यमंत्र्यांनी सभेत भाष्य केले. मुंबई, पुण्यातून निवडणूक लढण्यासाठी अनेकांनी आग्रह केला. परंतु मला माझ्या लोकांना सोडून कुठेही जायचे नव्हते. दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघानेच मला मोठे केले आहे. या मतदारसंघाचे व येथील मतदारांचे माझ्यावर प्रचंड उपकार आहे. त्यामुळेच मी येथूनच लढण्याच्या संकल्पावर कायम राहिलो, असे उद्गार त्यांनी काढले.
Maharashtra Assembly Election 2019 : २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देणार : मुख्यमंत्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 10:09 PM
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात त्याच्या हक्काच्या घराचे महत्त्व असते. त्यामुळे २०२१ पर्यंत राज्यातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचा आमचा संकल्प आहे व तो पूर्ण करूनच राहू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
ठळक मुद्देस्वत:च्या प्रचारासाठी प्रथमच घेतली सभा, नागपुरात भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी झंझावात