नागपूर : महाराष्ट्रातील महाविकास आघाडीला देश व राज्याचे जातीपातींमध्ये विभाजन करायचे आहे. त्यांचा विकास व जनतेच्या हिताच्या योजनांना विरोध आहे. ही आघाडी म्हणजे कुठलेही चांगले गठबंधन नसून खऱ्या अर्थाने ठगबंधन आहे, या शब्दांत केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी टीकास्त्र सोडले. नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात भाजपचे उमेदवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचारासाठी जयताळ्याजवळ आयोजित सभेदरम्यान ते गुरुवारी बोलत होते.
मी मध्य प्रदेशातील मुलांप्रमाणे महाराष्ट्रातील मुलांचादेखील मामा आहे. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रातदेखील लागू केल्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. पण, ही निवडणुकीची योजना नसून बहिणींच्या स्वाभीमानाची आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची योजना आहे. मध्य प्रदेशात आम्ही ही योजना सुरू केल्यावरदेखील कॉंग्रेसने टीकाच केली होती. आता काँग्रेसवाले देखील ३ हजार रुपये देऊ असे सांगत आहेत. मग आजवर त्यांनी यासाठी पुढाकार का घेतला नाही. तसेच योजनेच्या विरोधात ते न्यायालयात का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांची अवस्था तर इकडचेही नाही आणि तिकडचेही नाही, अशी झाली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना स्वर्गात त्रास देण्याचे काम ते करताहेत, अशी टीकाही त्यांनी केली. देवेंद्र फडणवीस हे केवळ वर्तमानच नाही, तर भारतीय राजकारणाचे भविष्य देखील आहेत. राज्याच्या आणि नागपूरच्या विकासाला साथ देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे हात बळकट करा. साऱ्या देशात फडणवीस यांच्या विजयाची चर्चा होईल, अशा पद्धतीने त्यांना जिंकून आणा, असे आवाहन चौहान यांनी केले.