Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अवघे चार दिवस उरले आहेत. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा जोरात प्रचार सुरू आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या 'बंटोगे तो कटोगे' या घोषणेचेही जोरदार चर्चा सुरू आहे. अशातच आता मंडी, हिमाचल प्रदेशमधील भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. एकात्मतेत बळ असते, असे लहानपणापासून वाचत आलो आहे, असे कंगना यांनी म्हटलं आहे. मात्र त्याआधी याविषयी बोलताना कंगना यांनी यासाठी काँग्रेसला जबाबदार धरलं होतं. त्यामुळे आता कंगना रणौत यांच्या या विधानाची चर्चा सुरु झाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात भाग घेतला आहे. मात्र नागपूर येथे माध्यमांशी बोलताना योगी आदित्यनाथ यांच्या बंटोगे तो कटोगे या घोषणेवर अजब विधान केले. या घोषणेबाबत कंगना आधी म्हणाल्या की, बंटेंगे तो कटेंगे किंवा वोट जिहाद असे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. नंतर जेव्हा त्यांना सांगण्यात आले की ही कथा योगी आदित्यनाथ यांची घोषणा होती तेव्हा कंगना यांनी ही एकतेची हाक आहे, असं म्हटलं.
"बंटोगे तो कटोगें हा आमचा मुद्दा नाही"
"वोट जिहाद किंवा बंटोगे तो कटोगें हे विरोधकांचे मुद्दे आहेत, आमचे नाहीत. विरोधी पक्षांनी स्वतःची कबर खोदली आहे. भाजप आपल्या कामाच्या जोरावर जिंकत आहे. तुम्ही नमूद केलेले हे मुद्दे विरोधकांनी उपस्थित केले आहेत. या विरोधकांनी स्वतःची कबर खोदली आहे. जाती-धर्माच्या आधारावर फूट पाडणे हे विरोधकांचे काम आहे. आमच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. विरोधकांकडू खळबळ माजवली जात आहे पण लोक त्याकडे लक्षही देत नाहीत," असं कंगना यांनी सुरुवातीला म्हटलं.
त्यानंतर कंगना यांनी योगी आदित्यनाथ यांनी दिलेल्या बंटोगे तो कटोगें या घोषणेबाबत विचारण्यात आले. याबाबत काँग्रेस आक्रमक असून भाजपला देशाचे विभाजन करायचे आहे, असे काँग्रेसचे म्हणणे आहे, असं माध्यमांनी विचारलं. यावर बोलताना "ही एकतेची हाक आहे. एकता हीच आपली ताकद आहे, असे आपण लहानपणापासून वाचत आलो आहोत. जोपर्यंत आपण एकत्र आहोत तोपर्यंत आपण सुरक्षित आहोत. जेव्हा आपण विभागले जाऊ तेव्हा आपण असुरक्षित होऊ. कुटुंबातही आपण म्हणतो की कुटुंब एकत्र असावे. त्याचप्रमाणे देशानेही एकत्र राहिले पाहिजे. आमचा पक्ष सनातनी पक्ष आहे. आमच्या पक्षाला पाकव्याप्त काश्मीरचा समावेश करायचा आहे आणि विरोधकांचा फूट पाडण्याचा डाव फसला आहे, असं कंगना यांनी म्हटलं.