Devendra Fadnavis, Maharashtra Assembly Election 2024 : मी इतकी वर्षे आमदार आहे, मुख्यमंत्री होतो, आज उपमुख्यमंत्री आहे पण अजूनही माझे मुंबईत स्वत:चे घर नाही. दक्षिण-पश्चिम नागपूर हेच माझे घर आहे, अशी भावनिक साद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मतदारांना घातली आणि सभेतील सगळ्यांनीच टाळ्यांचा कडकडाट केला. फडणवीस हे सहाव्यांदा या मतदारसंघातून लढत आहेत. चढत्या मताधिक्याने ते दरवेळी विजयी झाले आहेत. "कोणत्याही पदावर असलो, तरी दक्षिण-पश्चिमशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही, कोणत्याही जातीपातीच्या माणसांची कामे केली आणि म्हणूनच सर्वांनी आजवर विश्वास टाकला", असे म्हणत त्यांनी यावेळी भरघोस मताधिक्याने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.
राज्याच्या विविध भागांमध्ये देवेंद्र फडणवीस हे सध्या प्रचारसभांसाठी फिरताना दिसत आहेत. भाजप व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी त्यांचे विविध जिल्ह्यात दौरे सुरु आहेत. रविवारी त्यांनी नागपुरात आपल्या मतदारसंघात सभा घेतली. सभेला प्रचंड गर्दी झाली. त्यावेळी त्यांनी भावना व्यक्त केली. "माझी स्वत:ची कोणतीही संस्था नाही, कॉलेज नाही, मी नेहमीच लोकांचा विचार केला. इतके मुख्यमंत्री आजवर महाराष्ट्राने पाहिले पण मुंबईत स्वत:चे घर नसलेला मी एकच मुख्यमंत्री आहे," असे ते म्हणाले.
"नागपुरात आमचे नेते नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात २०१४ पासून या शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प आम्ही केला आणि यशस्वीही केला. मिहानमध्ये ८८ हजार जणांना रोजगार मिळाला, आता मोठी गुंतवणूक येऊ घातली असून आणखी एक लाख रोजगार मिळतील. सिमेंटचे रस्ते झाले, मेट्रो आली. नवीन विमानतळ येत आहे. ५०० कोटी रुपये खर्चून येथील वैद्यकीय महाविद्यालयांमधील सुविधा वाढविल्या. नागपुरात आयआयएम आले, एन.एम.कॉलेेज, सिम्बॉयसिससारख्या नामवंत शिक्षणसंस्था आल्या, आणखीही खूप काही करायचे आहे," असे म्हणत फडणवीस यांनी मतदारांचा आशीर्वाद मागितला.