नागपूर - विधानसभा निवडणुकीमध्ये मुख्य राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अनेक अपक्षही रिंगणात उतरत असतात. निवडणूक लढवायची म्हटली की, मोठ्या प्रमाणावर आर्थिक पाठबळ लागतं. काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांना ते सहज उपलब्ध होतं. मात्र अपक्ष उमेदवारांसमोर निवडणूक लढवण्यासाठी पैसे उभारणं हे आव्हानात्मक काम असतं. त्यात एखाद्या अपक्ष उमेदवाराला सढळ हाताने मदत करणाऱ्यांचं प्रमाणही कमी झालंय. मात्र उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अतुल खोब्रागडे हे याला अपवाद ठरले आहेत. अतुल खोब्रागडे यांच्या युवा ग्रॅज्युएट फोरमसोबत जोडल्या गेलेल्या नॉर्थ नागपूर सिनिअर सिटिझन फोरमच्याच्या सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एका महिन्याचे निवृत्तीवेतन खोब्रागडे यांना निवडणुकील लढवण्यासाठी दिले आहे. तसेच समाजाने नव्या नेतृत्वाला खुल्या हाताने मदत करावी असे आवाहन केले आहे.
या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सांगितले की, अनेक वर्षांपासून आम्ही उत्तर नागपूरमध्ये राहतो. आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध शासकीय सेवांमधून निवृत्त झालो आहोत. वयाच्या ६० ते ६५ नंतरही उत्तर नागपूरचे चित्र तसेच आहे. विकास हा केवळ कागदावर असून, येथील समस्यांचा सामना रोज करावा लागतो. आपल्या अनेक बांधवांना मुलांच्या शिक्षणाकरीता चांगल्या शाळा, चांगले शिकवणी वर्ग, नोकरीच्या संधी, चांगल्या आरोग्य सुविधांच्या शोधात आजही उत्तर नागपूर आहे. तीन वर्षांआधी युवा ग्रॅज्यूऐट फोरमच्या संपर्कात आल्यावर एक चांगले काम करण्याची संधी मिळाली. युवा ग्रॅज्यूएट फोरमचे अतुल खोब्रागडे या तरूणाने आम्हाला नॉर्थ नागपूर सिनिअर सिटीझन फोरमच्या माध्यमातून एकत्र आणले आणि उत्तर नागपूरच्या समस्या सोडविण्यासाठी प्रेरीत केले.
अतुल यांच्या सोबतीने आम्ही उत्तर नागपूरच्या अनेक समस्यांना सोडवल्या. कंन्व्हेंशन सेंटर, पाटणकर उद्यान, आवळे बाबू स्मारक, बर्डी मुख्य मार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, इंदोरा मेट्रो स्टेशन यासारखे अनेक मुद्दे मार्गी लावलेले आहेत. अतुल खोब्रागडे यांना प्रामाणिकपणा, बाबासाहेबांच्या विचारांप्रती समर्पण, प्रशासनाकडून कामे करवून घेण्याची शैली अतिशय वाखाणण्याजोगी आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये अशा समर्पित कार्यकर्त्यासोबत आम्ही सर्व उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.