योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : विधानसभा निवडणूकीचे मतदान आटोपल्यानंतर सायंकाळच्या सुमारास उपमुख्यमंत्री व दक्षिण-पश्चिम नागपुरचे भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी केवळ मतदानासाठी नागपुरात आलेले सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांच्याशी सुमारे २० मिनिटे चर्चा केली. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने विविध कयास लावण्यात येत आहेत.
फडणवीस हे सायंकाळी ६.२० मिनिटांच्या सुमारास महालातील संघ मुख्यालयात पोहोचले. सरसंघचालक उत्तरांचलहून केवळ मतदानासाठी नागपुरात पोहोचले होते. फडणवीस यांनी त्यांच्यासोबत भैय्याजी जोशी यांच्याशी चर्चा केली. सद्यस्थितीतील राजकीय चित्र, २३ नोव्हेंबरनंतरची राजकीय समीकरणे इत्यादींवर यात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सुमारे २५ मिनिटांनंतर फडणवीस तेथून रवाना झाले.
या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून देण्यात आलेली नाही. बुधवारी दिवसभर फडणवीस नागपुरातील विविध मतदान केंद्रांजवळील भाजपच्या बुथवरदेखील पोहोचले होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. अचानक सायंकाळी ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.