नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : वेगवेगळ्या कारणांमुळे प्रमुख उमेदवारांच्या समर्थक-विरोधकांमध्ये झडलेल्या आरोपांच्या फैरी, त्यावरून उडालेल्या शाब्दीक चकमकी आणि एका उमेदवाराच्या प्रचार बूथवरून पैसे वाटण्यात आल्याने त्या उमेदवाराचे ते बूथ सील करण्यात आल्याच्या घटनेमुळे राज्यातील हॉटसिट पैकी एक असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदार संघात आज दिवसभर जबरदस्त माहाैल राहिला.
आरएसएसचे मुख्यालय असलेल्या मध्य नागपूर विधानसभा मतदार संघाची निवडणूक महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्हीकडून प्रतिष्ठेची करण्यात आली होती. त्याचमुळे येथे महायु्तीचे उमेदवार प्रवीण दटके यांना निवडूण आणण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासह महायु्तीच्या अनेक स्टार प्रचारकांनी प्रचाराचा धडाका लावला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून अखिल भारतीय काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, रमेश चेन्नीथला, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, मध्य प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष जीतू पटवारी यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्टार प्रचारकांनी मध्य नागपूरात प्रचाराचा धुरळा उडवला होता.
दोन्हीकडून प्रेस्टीज बनविण्यात आल्याने उमेदवारांनी प्रचारात जान ओतली होती. या पार्श्वभूमीवर, आज सकाळपासून मतदानाला सुरूवात होताच जागोजागी वादाच्या ठिणग्या पडायला सुरूवात झाली. सकाळी ८ च्या सुमारास शाहिद बेकरीजवळच्या मतदान केंद्राशेजारी बॅरिकेडस् लावण्यावरून काँग्रेस उमेदवाराकडून आक्षेप घेतल्यामुळे वाद वाढला. तो निवळत नाही तोच रझा कॉम्प्लेक्सजवळ टेबल लावण्यावरून वाद झाला. दुपारी १२च्या सुमारास भाजपा कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करून अपक्ष उमेदवारांनी 'बॅट' हातात घेतल्याने तणाव निर्माण झाला. तर, १ वाजताच्या सुमारास टीमकी दादरा पुलाजवळ, दुपारी ४ च्या सुमारास हंसापुरी नालसाब चाैकाजवळ आणि श्रीराम स्वामी मंदीराजवळही वादाचे, आरोप प्रत्यारोपाचे प्रकार घडले.
हे सर्व सुरू असतानाच बांगलादेश नाईक तलाव पोलीस चाैकीजवळ असलेल्या बंटी शेळके यांच्या प्रचार बूथवरच्या रूममध्ये महिलांना बोलवून पैशाचे लिफाफे दिले जात असल्याची तक्रार झाली. भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत तेथे जाऊन येथून पैसे वाटले जात असल्याचा आरोप केला. यानंतर दोन्हीकडचे समर्थक आमनेसामने आल्याने तेथे मोठा तणाव निर्माण झाला. परिणामी सहपोलीस आयुक्तांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी, मोठ्या ताफ्यासह धडकले. विभागाच्या भरारी पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी शेळके यांच्या बूथवरची 'ती रूम' सील केली. पाच ते सात जणांना ताब्यातही घेतले.
डीसीपी बनले सिंघम, जमाव पिटाळून लावला
आरडाओरड, गोंधळाने परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे कळताच गस्तीवर असलेले गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल माकणिकर आपल्या ताफ्यासह तेथे धडकले. दोन्हीकडचे कार्यकर्ते कार्यकर्ते जुमानत नसल्याचे पाहून डीसीपी माकणिकर यांनी 'सिंघम स्टाईल' अवलंबून १० मिनिटातच जमाव पिटाळून लावला. दरम्यान, रात्री ७.३० च्या सुमारास पुन्हा कोतवाली झेंडा चाैकात सीसीटीव्ही काढल्याचा तसेच ईव्हीएम नेणाऱ्या गाडीवर हल्ला करण्याच्या आरोप प्रत्यारोपामुळे जमावाने कोतवाली ठाण्याला घेराव घातला होता.