लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य सरकारच्या अर्थसंकल्पाने विदर्भाला काही प्रमाणात निराश केले आहे. विदर्भवाद्यांचे म्हणणे आहे की, अर्थसंकल्पाबाबत राज्यपालांचे दिशा-निर्देश नसल्याने राज्य सरकारने विदर्भासाठी कुठलीही विशेष तरतूद केलेली नाही. विदर्भातील सर्वात मोठी समस्या सिंचनाची आहे, परंतु येथील निर्माणाधीन १०४ प्रकल्पांसाठी कुठलीही खास तरतूद करण्यात आलेली नाही.
शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात विदर्भाचा विचार केला तर सर्वात दिलासा देणारी बाब म्हणजे बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा-गोंदियापर्यंत केला जाईल. सोबतच गडचिरोलीलाही जोडले जाईल. गोसीखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पासाठी सन २०२२-२३ साठी ८५३ कोटी ४५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गोसीखुर्दवर आधारित जलपर्यटन प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आला आहे; परंतु इतर सिंचन प्रकल्पांबाबत मात्र कुठलाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नाही. विदर्भवादी नितीन राेंघे यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात यासाठी कुठलीही विशेष तरतूद करण्यात आलेली नाही.
विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य कपिल चंद्रायण यांनी सुद्धा यावर चिंता व्यक्त केली आहे. विदर्भासाठी जाहीर करण्यात आलेल्या तरतुदींवर अंमलबजावणी होईल की नाही हे पाहावे लागेल, असे त्यांचे म्हणणे आहे. विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. संजय खडक्कार यांनी सुद्धा गोसीखुर्दसाठी पैसे मिळाले पण पश्चिम विदर्भाचे काय? सिंचनाचा अनुशेष प्रामुख्याने पश्चिम विदर्भाचा आहे. त्यामुळे येथे वैधानिक मंडळे नसल्याचे प्रामुख्याने जाणवते, असे म्हटले आहे.
विदर्भाला काय मिळाले
- समृद्धी महामार्गाचा भंडारा-गोंदियापर्यंत विस्तार
- गोसीखुर्द प्रकल्पाला ८५३ कोटी ४५ लाख रुपये
- सोयाबीन व कापूस पिकांसाठी विशेष कृती योजना, तीन वर्षांत एक हजार कोटी रुपये मिळणार
- अमरावती, भंडारा येथे ५० बेडचे ट्रॉमा केअर युनिट
- यवतमाळ, बुलडाणा, वर्धा, भंडारा येथे महिलांसाठी १०० खाटांचे रुग्णालय
- नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था येथे पदव्युत्तर संस्था स्थापन होणार
- प्रत्येक जिल्ह्यात महिला व बाल भवन
- अमरावती विमानतळाचा विस्तार, गडचिरोलीतील विमानतळाचाही विचार
-कचराला (चंद्रपूर) आणि यवतमाळ येथे सौर ऊर्जा प्रकल्प
- नागपुरात स्वातंत्र्यलढ्याशी निगडीत स्थळांचा ‘हेरिटेज वॉक’