आता काँग्रेस नेतेही काढणार दर्शन यात्रा; नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांची जूनमध्ये अयोध्या वारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 11:53 AM2022-05-21T11:53:14+5:302022-05-21T12:08:52+5:30

हा कुठलाही राजकीय दौरा नसून, केवळ प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जात असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

Maharashtra Congress chief Nana Patole to visit Ayodhya on June 7th, party calls it ‘pilgrimage’ | आता काँग्रेस नेतेही काढणार दर्शन यात्रा; नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांची जूनमध्ये अयोध्या वारी

आता काँग्रेस नेतेही काढणार दर्शन यात्रा; नाना पटोलेंसह प्रमुख नेत्यांची जूनमध्ये अयोध्या वारी

googlenewsNext

नागपूर : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा स्थगित केला असला तरी आता काँग्रेस नेत्यांनी अयोध्या वारी करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील प्रमुख काँग्रेस नेते जूनच्या दुसऱ्या आठवड्यात अयोध्येसाठी दर्शन यात्रा काढणार आहेत. हा कुठलाही राजकीय दौरा नसून, केवळ प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जात असल्याचेही काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावावर भाजपसह काही-काही पक्ष राजकारण करीत असताना दशरथ गढीचे प्रमुख महंत यांनी दोन आठवड्यांपूर्वी मुंबईतील टिळक भवन या काँग्रेस कार्यालयात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. त्यांनी अयोध्येला दर्शनाचे निमंत्रण दिले. ही काँग्रेससाठी केवळ सन्मानाची बाब नसून हा प्रभू रामांचा आशीर्वाद आहे. इतर पक्षांचे नेते राजकारणासाठी अयोध्येचा दौरा करतात. आम्ही मात्र दर्शनाला व आशीर्वाद घ्यायला जाणार आहोत. देशात खऱ्या अर्थाने रामराज्य यावे व देशाचे जे मानसिक विभाजन होत आहे, विकासाचा रथ गर्तेत रुतला आहे, तो बाहेर काढण्याची शक्ती देवो, अशी प्रभू रामांकडे प्रार्थना करणार आहेत, असेही लोंढे यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे यांची भाजपने फसवणूक केली

काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले, भाजपमुळे देशातील राजकीय परिस्थिती गढूळ झाली आहे. खा. ब्रृजभूषण सिंग यांना भाजप थांबवू शकत नाही, असे होऊ शकते का? मुळात राज ठाकरे यांचा पिंडच तसा नाही; पण ते भाजपच्या रणनीतीला बळी पडले आहेत. जे ब्लू प्रिंटबाबत बोलत होते, विकासाच्या अजेंड्यावर बोलत होते; आज तीच व्यक्ती धर्माच्या नादी लागली. भाजपने राज ठाकरे यांचा वापर केला आहे. राजकीय भूमिका कोणती घ्यायची हा त्यांचा अधिकार आहे. मात्र, भाजपने त्यांची फसवणूक केली आहे, अशी टीकाही लोंढे यांनी केली.

Web Title: Maharashtra Congress chief Nana Patole to visit Ayodhya on June 7th, party calls it ‘pilgrimage’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.