नागपूर : राज्याबाहेरच्या नेत्यांना दुसऱ्या राज्यातून राज्यसभेची उमेदवारी देण्यावर काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एकप्रकारे नाराजी व्यक्त केली आहे. ज्या-ज्या वेळी बाहेरच्या राज्यातून उमेदवारी दिली जाते त्या-त्या वेळी संबंधित राज्यात नाराजी होत असते. मुकुल वासनिक यांना महाराष्ट्रातून तर इम्रान प्रतापगढी यांना उत्तर प्रदेशातून उमेदवारी द्यावी व तसा बदल करावा, अशी विनंती आपण पक्षश्रेष्ठींना केली होती, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले, मुकुल वासनिक यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर आपण त्यांचे अभिनंदन केले. मात्र, मी त्यांना महाराष्ट्रातून उमेदवारी घेण्याचा सल्ला दिला. यामुळं त्यांचा नागपूर आणि विदर्भात संपर्क कायम राहील. तसेच इमरान प्रतापगढी यांनी उत्तर प्रदेश मधून अर्ज भरावा, असा बदल करावा असे माझे मत आहे. मात्र हा केंद्रीय पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे. त्यांनी विचारपूर्वक ही उमेदवारी दिली असेल. असे का करण्यात आले हे आपल्या आकलनापलिकडे आहे. मात्र, अजूनही वेळ आहे. त्यामुळे या दोन राज्यसभांच्या उमेदवारीमध्ये बदल केला पाहिजे असं माझं मत असून ही उमेदवारी बदलली जावी. हा विषय आपण पक्षश्रेष्ठींकडे पोहचविला आहे. यासंदर्भात एक बैठक होती, मात्र ती रद्द झाली, असेही त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीत काँग्रेसला डावलले जात आहे
- महाविकास आघाडी मध्ये काँग्रेसला डावलले जातेय हे खरे आहे. मात्र सध्या काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. नेत्यांनी लढत राहिले पाहिजे, यात अवघड नाही. आघाडीतुन काँग्रेस बाहेर पडणार नाही, मात्र संवाद वाढविला पाहिजे, समन्वय वाढविला पाहिजे, अशी सूचना चव्हाण यांनी केली.
खाते कुणाकडेही असले तरी निधी समान।दिला।पाहिजे. मात्र, असे होताना दिसत नाही. नाराजी वाढत आज. याला वाचा फोडली पाहिजे, असेही ते म्हणाले.