कमलेश वानखेडे
नागपूर :काँग्रेसचे मंत्री आमदारांना विश्वासात घेत नाहीत. विकास कामांबाबत विचारत नाही. पालकमंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. काही मंत्र्यांचा तोरा वाढला असून जनतेशी वागणूकही बदलली आहे. अशा मंत्र्यांना एकतर पदावरून दूर करा किंवा त्यांचे परफॉर्मन्स ऑडिट करा, अशी मागणी करीत आमदारांनीसोनिया गांधी यांच्याकडे मंगळवारी रात्री तक्रारींचा पाढा वाचला. आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे सोनिया गांधी यांनी आमदारांना आश्वस्त केले.
काँग्रेसच्या ३१ आमदारांनी मंगळवारी रात्री काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. दोन ते तीन वेळा निवडून आलेल्या ज्येष्ठ आमदारांनी यावेळी थेट मंत्र्यांवर हल्लाबोल केला. राष्ट्रवादी व शिवसेनेचे मंत्री महिन्यातून एकदा त्यांच्या आमदारांची बैठक घेऊन अडचणी जाणून घेतात. काँग्रेसचे मंत्री मात्र तसे करत नाहीत. सीएलपी मिटिंगही नियमित होत नाही. मंत्र्यांनी किमान त्यांच्या मंत्रालयात अडलेली कामे मार्गी लावावी. मात्र, मंत्री पक्ष संघटनेला महत्व देत नाहीत. ते स्वत:च्या मंत्रिपदातच खूश आहेत. महामंडळांवरील नियुक्ती अद्याप झालेल्या नाहीत, अशा तक्रारींचा पाढाच आमदारांनी वाचला. असेच सुरू राहिले तर काँग्रेसचे १०० आमदार कसे निवडून येणार, असा प्रश्न आमदारांनी सोनिया गांधी यांच्यापुढे मांडला. सोनिया गांधी यांनी सर्व मुद्दे ऐकून घेत यावर उपाय योजण्याचे आश्वासन दिले, असे एका ज्येष्ठ आमदाराने लोकमतशी बोलताना सांगितले.
सोनिया गांधी यांना भेटलेल्या आमदारांमध्ये संग्राम थोपटे, कुणाल पाटील, अमीन पटेल, कैलास गोरंट्याल, अमित झनक, सुभाष धोटे, विकास ठाकरे, अभिजित वंजारी, अमर राजूरकर, बळवंत वानखेडे, मोहन हंबर्डे, राजेश राठोड, राजू पारवे, प्रतिभा धानोरकर, सुलभा खोडके, विक्रम सावंत, संजय जगताप, पी.एन. पाटील, शिरीष नाईक, शिरीश चौधरी, प्रज्ञा सातव, राजेश एकडे, लहु कानडे आदींचा समावेश होता.