Maharashtra Government: ''मध्यावधी निवडणुका नाही, पाच वर्षे स्थिर सरकार देऊ''
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 06:28 AM2019-11-16T06:28:00+5:302019-11-16T06:29:44+5:30
राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत.
नागपूर : राज्यात कुठल्याही परिस्थितीत मध्यावधी निवडणुका होणार नाहीत. पाच वर्षे स्थिर सरकार देण्याचाच आमचा प्रयत्न असेल व येणारे सरकार तकलादू नसेल, असे राष्ट्र वादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार स्पष्ट केले. मुस्लीम आरक्षण लागू करण्यासंदर्भात सरकार स्थापन झाल्यानंतर सर्व पक्ष मिळून एकत्रित भूमिका ठरवतील. धर्मनिरपक्षेतेशी तडजोड करणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
विदर्भ दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. राज्यात सरकार कधी स्थापन होईल हे आता सांगता येते नाही. काँग्रेसने प्रतिनिधी नेमले आहेत व राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांची चर्चा सुरू आहे. काँग्रेस व शिवसेना वगळता कुणाशीही आमची चर्चा सुरू नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री कोण असेल, असे विचारले असता, आताच कशाला ‘कार्ड’ खुले करू, एवढेच त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी व सरसकट कर्जमाफी मिळावी, यासाठी प्रयत्न राहणार आहे. केंद्र या स्थितीबाबत किती गंभीर आहे ते माहिती नाही, पण शेतकऱ्यांना मदत मिळावी, यासाठी कृषी व वित्त मंत्रालयाशी चर्चा करू. तेथून दिलासा मिळाला नाही, तर थेट पंतप्रधान मोदींची भेट घेऊन, असे पवार यांनी सांगितले.
सरसकट पंचनामे व्हावेत
अवकाळी पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ३३ टक्क्यांहून जास्त नुकसान झालेल्या पीकजमिनींचे पंचनामे करण्यात येत आहेत. मात्र, हे मापदंड योग्य नसून यात बदल करण्याची गरज असून सरसकट पंचनामे झाले पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.
महिला मुख्यमंत्र्यांसंदर्भात विचार नाही
राष्ट्रवादी काँग्रेसचा अडीच वर्षे मुख्यमंत्री झाला, तर सुप्रिया सुळे यांचे नाव समोर येऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे, परंतु पवार यांनी अशी शक्यता खोडून काढली आहे. महिला मुख्यमंत्री झाली, तर आनंदच आहे. मात्र, या संदर्भात कुठलीही चर्चा किंवा प्रस्ताव नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शिवाय, शिवसेना-आघाडी सरकारचा मुख्यमंत्री कोण होणार, यावरही त्यांनी भाष्य टाळले.
>शरद पवार म्हणाले, ‘मी पुन्हा येईन’
तीन पक्षांचे सरकार टिकणार नाही व राज्यात भाजपचेच परत सरकार येईल, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून करण्यात येत आहे. यावर ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’ इतकेच माझ्या डोक्यात असल्याचा चिमटा पवार यांनी काढला. फडणवीसांविषयी जेवढी माहिती आहे, त्यात ते ज्योतिषशास्त्राचेही अभ्यासक आहेत हे माहीत नव्हते, अशी कोपरखळीही त्यांनी मारली.