लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला ४७२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, आर्वी विधानसभा क्षेत्रात काँग्रेसने मुसंडी मारली आहे, तर सेलू तालुक्यात भाजपचा सुपडा साफ झाल्याचे चित्र स्पष्ट झाले.
आर्वी तालुक्यातील ग्रा.पं.वर काँग्रेसचा झेंडा
आर्वी तालुक्यात सात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आल्या. यामध्ये मोठी ग्रामपंचायत असलेल्या वर्धमनेरी येथे गेल्या दहा वर्षांपासून भाजपची सत्ता होती. यावेळी मात्र, काँग्रेसने नऊ जागा जिंकून बाजी मारली. येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष कांचन नांदुरकर यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविल्या गेली. मात्र, भाजपचा जोरदार पराभव झाला. वर्धमनेरी ग्रा.पं.वर काँग्रेसचे मामा चौधरी व नरेंद्र बढिये यांच्या गटाने मोठा विजय मिळविला. आर्वी विधानसभा मतदार संघातील धनोडी बहाद्दरपूर ग्रा.पं.वर काँग्रेसने सहा तर भाजपने ३ जागांवर विजय मिळविला. धनोडी बहाद्दरपूर येथील नऊ सदस्यीय ग्रा.पं.मध्ये नऊ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने सहा जागेवर तर भाजपने तीन जागेवर विजय मिळविला असून, काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली. मागील निवडणुकीत भाजपचा एकही सदस्य निवडून आला नव्हता. मात्र, यंदा तीन सदस्य निवडून आल्याने भाजपने खाते उघडले आहे. काँग्रेसच्या विजयी उमेदवारात वॉर्ड १ मधील अमोल शंकर नाखले, वैशाली सचिन झोपाटे, माधुरी पंकज कावळे तर वॉर्ड २ मधून रवींद्र लक्ष्मण नाखले, शिल्पा अनिल पाटील, सविता नितेश मुडे यांचा समावेश आहे, तर भाजपचे वॉर्ड ३ मधून अमोल वासुदेव गुजर, अरुण महादेव भंडारी, वंदना दिलीप भोयर हे उमेदवार विजयी झाले. काँग्रेससाठी नितीन झोपाटे, राजेंद्र नाखले यांनी तर भाजपसाठी शरद निखर व कार्यकर्त्यांनी जोर धरला.
आष्टी तालुक्यात भाजपला स्पष्ट बहुमत
आष्टी तालुक्यातील सवार्त मोठी तळेगाव श्यामजीपंत ग्रामपंचायतीवर भाजपने एकहाती सत्ता मिळविली आहे. जिल्हा परिषद सदस्य अंकिता होले यांचे पती सचिन होले यांच्या गटाने नऊ जागांवर घवघवीत यश संपादन केले. येथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे गटाला तीन, प्रभा राव गटाला १ तर गुरुदेव पॅनलला चार जागांवर समाधान मानावे लागले. आष्टी तालुक्यातील सर्वात मोठी १७ सदस्य संख्या असणारी तळेगांव (शा.पं) ग्रा.पं. आहे. भाजपचे ९ उमेदवार निवडणून आले असून, काँग्रेसचे ३ उमेदवार तर गुरुदेव पॅनलचे ४ व जोरे गटाचा १ उमेदवार विजयी झाला. यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले असून, विजयी उमेदवारामध्ये वाॅर्ड क्र.१ मधून पुष्पा मधुकर कदम, कलामशहा बब्बुशहा, मंदा नेहारे, वाॅर्ड क्र. २ मधून वैशाली सुनिल कळसकर, दुर्गा जनार्दन गाडगे, बबन प्रकाश गाडगे, वाॅर्ड ३ मधून कविता अनिल फसाटे, रूपेश नारायन बोबडे, वाॅर्ड ४ मधून राजेश सुरेश करोले, रमेश पुंडलिक महाडिक, सचिन रामभाऊ पाचघरे, वाॅर्ड ५ मधून सुनिता ज्ञानेश्वर उईके, सारिका हेमंत गुळभेले, चंद्रशेखर साहेबराव जोरे, वाॅर्ड ६ मधून त्रिशूल धनराज भुयार, चंदाकाैर किसनसिंग बावरी, छबू रमेश खंडार हे १७ उमेदवार विजयी झाले आहे. यामध्ये सरपंच पदाचे आरक्षण कोणत्या प्रवर्गातील निघेल व सरपंचपदाची माळ कोणत्या उमेदवाराच्या गळ्यात पडेल, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. अंतोरा ग्रामपंचायतीवर नऊही जागांवर काँग्रेसने विजय मिळविला आहे, तर थार ग्रामपंचायतीवर काँग्रेसला सहा तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत. पोरगव्हाण ग्रामपंचायतीवर भाजपला सहा तर काँग्रेसला तीन जागांवर यश मिळाले.
युवा परिवर्तनचे तीन उमेदवार विजयी
गाव तिथे परिवर्तन या उद्देशाने युवा परिवर्तन की आवाज संघटनेचे संस्थापक निहाल पांडे यांच्या मार्गदर्शनात राहुल दारुणकर यांच्या नेतृत्वात आजंती येथील निवडणुकीत ११ उमेदवार उभे करण्यात आले होते. यापैकी तीन उमेदवार विजयी झाले, तर एक उमेदवार पराभूत झाला. वॉर्ड १ मधून प्रीतम मोतीराम कुमरे, वॉर्ड २ मधून अर्चना किशोर कोल्हे तर त्रिशला मनोज कळमकर विजयी झाले.