आॅनलाईन लोकमतनागपूर : गुजरातच्या निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत महाराष्ट्र भाजपानेही प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. राज्यातील आमदारांना गुजरातमध्ये जाऊन प्रचार करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या अंतर्गत उत्तर नागपूरचे आमदार डॉ. मिलिंद माने सात दिवस गुजरातमध्ये वास्तव्यास होते. या काळात त्यांनी दलित वस्त्यांमध्ये पदयात्रा, बैठका, सभा घेऊन भाजपासाठी मते मागितली.गुजरात प्रचार दौऱ्यासाठी भाजपातर्फे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, आ. सुधीर पारवे, आ. डॉ. मिलिंद माने, नाना शामकुळे, रामचंद्र अवसरे यांच्यावर दलित वस्त्यांमध्ये प्रचाराची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यापैकी बडोले व माने यांनी आपला दौरे पूर्ण केले. सात दिवसांचा प्रचार आटोपून नागपुरात परतल्यावर आ. माने यांनी लोकमतशी बोलताना गुजरातमधील प्रचारावर दृष्टिक्षेप टाकला. ते म्हणाले, आपल्यावर सुरेंद्रनगर जिल्ह्यातील वढवान या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी होती. सकाळी ८ ते दुपारी १२ पर्यंत दलित वस्त्यांध्ये पदयात्रा असायची. भाजपा सरकारने केलेल्या विकास कामांची पत्रके घरोघरी जाऊन वितरित केली जायची. यानंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ पर्यंत मोहल्ला मिटिंग व्हायच्या. सायंकाळी ६ ते रात्री १२ पर्यंत जाहीर सभा घेतल्या जायच्या. या सर्व प्रचारयात्रेत भाजपाने दलित, मागासवर्गींसाठी केलेली कामे तेथील जनतेला सांगण्याची जबाबदारी आपण पार पाडली. याला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. आपण स्वत: डॉक्टर असल्यामुळे तेथील डॉक्टरांची एक स्वतंत्र बैठकही घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.व्यापारी, पाटीदार, पटेल मोदींसोबतच माने म्हणाले, नोटाबंदी व जीएसटीचा फारसा परिणाम गुजरातच्या निवडणुकीवर होणार नाही. गुजरातमधील व्यापारी, पाटीदार समाज, पटेल समाज पंतप्रधान मोदींवर नाराज असल्याचे चित्र रंगविले जात आहे. यात वास्तविकता नाही. हे सर्व मोदींनाच मानतात. जीएसटीचा कराचा टप्पा कमी करावा एवढीच व्यापाऱ्यांची अपेक्षा आहे. आपण पाटीदार समाजाच्या मतदारांची भेट घेऊन चर्चा केली असता हा समाज भाजपासोबतच असल्याचे दिसून आले. निवडणुकीपर्यंत आणखी चित्र सुधारेल व भाजपालाच मतदान होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.दिग्गज बाजूला, नव्यांना संधी गुजरातमध्ये बऱ्याच मतदारसंघात १० ते १५ वर्षे आमदार राहिलेल्यांना यावेळी तिकीट देण्यात आलेले नाही. तर त्यांच्या जागी युवक व नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. सामाजिक आधारावरही प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न झाला आहे. याचा मतदारांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येत असून याचा भाजपाला फायदाच होईल, असा विश्वास माने यांनी व्यक्त केला.कार्यकर्त्यांच्या घरीच मुक्काम सात दिवसांच्या गुजरात प्रचार दौऱ्यात आ. मिलिंद माने यांनी हॉटेलमध्ये राहणे टाळले. त्यांचा मुक्काम कार्यकर्त्याच्या घरीच होता. कार्यकर्त्यांसोबतच भोजन घेतले. स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांवर याचा सकारात्मक प्रभाव दिसून आल्याचे माने यांनी सांगितले.