लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - शौर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे. सोबतच आपल्या गौरवपूर्ण कामगिरीचा झेंडाही फडकावला आहे. नागरिकांच्या जानमालाचे संरक्षण करून कायदा आणि सुव्यवस्थेची घडी नीट राखण्यात महाराष्ट्राचे पोलीस दल देशात नेहमीच अव्वल राहिले आहे.
हे करतानाच दहशतवादी, नक्षलवाद्यांशी सामना करून प्रसंगी जीवाची बाजी लावण्यातही पोलीस दल नेहमीच आघाडीवर असते. पोलिसांच्या कामगिरीचा देशपातळीवर राज्यनिहाय स्वतंत्र आणि सांघिक स्वरूपात तुलनात्मक आढावा घेऊन त्यांना विविध प्रकारची पदके प्रदान केली जातात. शौर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमजी), राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते.
यावर्षीदेखील देशातील विविध राज्यांतील सुरक्षा दलाला ही पदके जाहीर झाली आहेत. त्यात महाराष्ट्र पोलीस दलाला १३ शौर्य पदके, विशेष उल्लेखनीय सेवेची ४ तर गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल ४० अशी एकूण ५७ पदके मिळाली आहेत. जम्मू आणि काश्मिर पोलिसांना ५२ शौर्य, २ उल्लेखनीय तर १७ गुणवत्तापूर्ण सेवेची अशी एकूण ७१ आणि उत्तरप्रदेश पोलिसांना ८ शौर्य, ७ उल्लेखनीय सेवा तर ७२ गुणवत्तापूर्ण सेवेची (एकूण ८७) पदके मिळाली आहे. ३२ राज्याच्या दलात सिक्कीम, पांडेचरी, अंदमान निकोबार आणि चंदीगडला प्रत्येकी केवळ एक (गुणवत्तापूर्ण सेवा) पदक मिळाले आहे.