शुक्रवारी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने ओबीसींच्या आरक्षणासाठी आवाज बुलंद करण्यात आला. संघटनेचे पदाधिकारी संविधान चौकात जमले. त्यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी लाक्षणिक उपोषण आंदोलन केले. दरम्यान, आंदोलनात ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षणासाठी सुप्रीम कोर्टाला अपेक्षित इम्पिरियल डाटा महाराष्ट्र शासनाने तीन महिन्यात सादर करावा, महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे, महाराष्ट्रात राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुकीसाठी काढलेली अधिसूचना रद्द करण्यासाठी राज्य शासनाने त्वरित सुप्रीम कोर्टात अपील दाखल करावे, राज्य व केंद्र शासनाने मंडल आयोगाच्या सर्व शिफारशी लागू कराव्यात, केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाने ओबीसींची जातिनिहाय जनगणना करावी, ओबीसींच्या संख्येच्या प्रमाणात/टक्केवारीनुसार त्यांना प्रत्येक क्षेत्रात आरक्षण द्यावे आणि राज्य व केंद्र शासनाने जातिनिहाय जनगणनेनुसार ओबीसी आरक्षणाचा कायदा करावा, आदी मागण्या आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. मागण्या मान्य न झाल्यास महासभेतर्फे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, महिला, युवा व सेवा आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
............