आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्र राज्याने खूप प्रगती केली आहे. प्रत्येक क्षेत्रात प्रगती केलेली आहे. परंतु हा विकास असमतोल असा आहे. धोरणे राबवताना येथील संसाधनांचा योग्य उपयोगच झालेला नाही. परिणामी महाराष्ट्रातील २० टक्के लोकांकडे तब्बल ८५ टक्के संपत्ती आहे. त्यामुळे या विकासाचा येथील गरिबांना कुठलाही फायदा झाल्याचे दिसून येत नाही. महाराष्ट्र राज्यातील विकासाचे हे वास्तव विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष व सामाजिक व आर्थिक समता संघ (असोसिएशन फॉर सोशल अॅण्ड इकोनॉमिक इक्वॅलिटी) या अराजकीय संघटनेचे संस्थापक डॉ. सुखदेव थोरात यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत मांडले.डॉ. सुखेदव थोरात यांनी सांगितले की, सामाजिक व आर्थिक समता संघ हे अखिल भारतीय स्तरावरील अराजकीय सामाजिक संघटना आहे. शोषित समाजघटकांच्या समस्यांची जाणीव जागृती समाजात वाढविणे, त्यांच्या गरिबी व मानवी अधिकारांच्या हननांची तसेच त्यांच्या उपेक्षिततेची कारणे शोधणे, प्रकाशित दस्ताऐवजांच्या माध्यमातून धोरणे तयार करून त्यावर उपाय सुचविणे व शासकीय योजनांचा समाजातील योग्य व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी प्रारूप विकसित करणे हे संघटने मुख्य कार्य आहे. महाराष्ट्रातील दलितांची स्थिती यावर अभ्यास करण्याचे कार्य संघटनेला मिळाले होते. परंतु संघटनेने महाराष्ट्रातील एकूण विकासाची स्थिती आणि त्यातही दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम व एकूणच समाजघटकांच्या विकासाची स्थिती यावर तब्बल तीन वर्षे सर्वांगिण अभ्यास करून एक अहवाल सादर केला आहे.या अभ्यासामध्ये उपरोक्त बाब दिसून आली आहे. दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्र देशात नंबर १ आहे. परंतु गरिबी, कुपोषण व शिक्षण या ह्युमन इंडिकेटरचा विचार केल्यास महाराष्ट्र हे देशातील अनेक मागासलेल्या राज्यांपेक्षा खूप मागे असल्याचे दिसून येते.गरिबीमध्ये महाराष्ट्राचा ६ वा नंबर, शिक्षणात १० वा तर कुपोषणामध्ये १६ वा नंबर आहे. दरडोई उत्पन्नामध्ये मागास असलेल्या अनेक राज्यांची स्थिती शिक्षण, गरिबी व कुपोषणाबाबत चांगली आहे. याच विकासामध्ये दलित, आदिवासी, ओबीसी, मुस्लीम व उच्च वर्णीयांचा विचार केल्यास दलित आदिवासींची स्थिती ओबीसींमध्ये वाईट आहे. ओबीसी दलित-आदिवासींमध्ये चांगले असले तरी उच्चवर्णीयांपेक्षा त्यांची स्थिती वाईट आहे. मुस्लीमांची आर्थिक परिस्थिती दलित-आदिवासीपेक्षा थोडी चांगली असली तरी शिक्षणात ते माघारलेले आहे, असा एकूणच विकासाचा असमतोल दिसून येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.पत्रपरिषदेला डॉ. कृष्णा कांबळे, डॉ. एम.एल. कासारे, डॉ. सुनील तलवारे, डॉ. त्रिलोक हजारे, डॉ. गौतम कांबळे आदी उपस्थित होते. माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते होणार उद्घाटनसामाजिक व आर्थिक समता संघाचे अधिकृत उद्घाटन माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या हस्ते २६ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासहेब आंबेडकर सभागृहात करण्यात येणार आहे. यावेळी संघटनेने जाहीर केलेल्या अहवालांचे प्रकाशनही त्यांच्या हस्ते करण्यात येईल. महाराष्ट्रातील गरिबी, असमानता व सामाजिक भेदभाव यावर दिवसभर चर्चासत्र होईल.