Vidhan Sabha 2019: विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2019 04:14 AM2019-09-23T04:14:11+5:302019-09-23T04:14:32+5:30
काँग्रेसचे विदर्भ प्रभारी; गटबाजीची चिन्हे
- राजेश शेगोकार
अकोला : एकेकाळी काँग्रेसचा गड असलेल्या विदर्भात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ जागांवर भाजपचे ‘कमळ’ फुलले तर अवघ्या १० जागांवर काँग्रेसला विजय मिळविता आला. या पृष्ठभूमीवर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसपुढे आव्हानांचा डोंगर आहे. काँग्रेसने प्रथमच निवडणुकीसाठी विभागवार प्रभारींची निवड केली असून, विदर्भाची जबाबदारी ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांच्यावर देण्यात आली आहे.
काँग्रेसने उमेदवारी नाकारली तर ‘वंचित’सोबत घरोबा करण्याची तयारी काहींनी करून ठेवली आहे. त्यामुळे मेरिटवर उमेदवारी देण्यात वासनिक यशस्वी ठरले तर लढाईमधील पहिला टप्पा ते जिंकतील, अशी स्थिती आहे. काँग्रेसमध्ये त्यांच्या शब्दाला महत्त्व आहे. पश्चिम विदर्भात तर त्यांचा शब्द हा काँग्रेसमध्ये प्रमाण आहे.
यवतमाळ व नागपुरातील गटबाजी सर्वश्रुत आहे. बुलडाण्यात चिखलीचे आमदार हे पक्षांतराच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. अकोला जिल्हा काँग्रेसमुक्त जिल्हा झाला आहे. दोन दशकांपासून काँग्रेसला हा हक्काचा आमदार मिळालेला नाही. मित्रपक्ष असलेल्या राष्टÑवादीमध्ये अनेक नेते हे वासनिकविरोधी आहेत. काँगे्रसला एकसंधपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्यात वासनिकांना कितपत यश येते, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.